ही घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील आहे. तर हत्या झालेल्या विवाहितेचं नाव निक्की आहे. निक्की हुंडाबळी प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. निक्कीला तिचा पती विपिनने हुंड्यासाठी जाळून मारल्याचा आरोप आहे. याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीने निक्कीच्या भावाशी संवाद साधला असता त्याने आपल्या दाजीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. "माझ्या वडिलांनी नुकतीच मर्सिडीज कार खरेदी केली होती. विपिनची त्यावर नजर होती. विपिन मर्सिडीजचीही मागणी करत होता. यासोबतच ६० लाख रुपये रोख रक्कमही मागितली जात होती", असा आरोप निक्कीच्या भावाने केला. ही कार आणि रक्कम न दिल्याने ही हत्या केल्याचा आरोप निक्कीच्या कुटुंबीयांनी केला.
advertisement
वडिलांनी कठोर कारवाईची मागणी केली
निकीच्या वडिलांनी सांगितले की, विपिन आणि त्याच्या कुटुंबाने लग्नात स्कॉर्पिओची मागणी केली होती. त्यानंतर मी त्यांना स्कॉर्पिओ दिली. नंतर मी बुलेटही दिली. असे असूनही, विपिन आणि इतर कुटुंबीयांकडून सातत्याने हुंड्याची मागणी केली जात होती. माझ्या मुलीवर नेहमीच अत्याचार केले जात होते. विपिनचे दुसऱ्या मुलीशीही संबंध होते. अशा परिस्थितीत, विपिन आणि त्याची आई मुलीला सतत त्रास देत होती.
मुलीने अनेकदा मारहाण झाल्याचे सांगितले होते. अनेक वेळा पंचायतही झाली. मला विपिन, त्याचे वडील आणि आई यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे. जर कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही एसएसपी कार्यालयाबाहेर धरणे धरू, असा इशाराही त्यांनी दिला.
हल्ल्यानंतर पतीने तिला जाळून टाकले
पती विपिनने प्रथम निक्कीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला जाळून टाकले. गंभीर अवस्थेत निक्कीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा जीव वाचू शकला नाही, असंही निक्कीच्या वडिलांनी सांगितलं. या प्रकरणी विपीनसह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींना लवकरच अटक करू, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.