अहमदाबादच्या शाहीबाग परिसरात राहणाऱ्या 48 वर्षीय हितेश जैनची ही गोष्ट. हितेश हा काही जन्मत: गुन्हेगार नव्हता. त्याचं आयुष्य सामान्य होतं. त्याने एका मुलीवर मनापासून प्रेम केलं आणि तिच्याशी लग्नही केलं. प्रेमाची साक्ष म्हणून त्याने आपल्या पत्नीला एक ॲक्टिव्हा (Activa) गाडी गिफ्ट दिली होती. पण, नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
काही काळानंतर हितेशला समजलं की, ज्या पत्नीवर त्याने जीवापाड प्रेम केलं, तिचं दुसऱ्या एका तरुणासोबत अफेअर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हितेशने प्रेमाने दिलेली ती ॲक्टिव्हा घेऊनच त्याची पत्नी आपल्या प्रियकराला भेटायला जायची. हा अपमान हितेशच्या जिव्हारी लागला. पत्नीच्या या बेवफाईने हितेशच्या मनावर असा काही परिणाम केला की, त्याने चक्क ॲक्टिव्हा गाड्यांनाच आपलं टार्गेट बनवायला सुरुवात केली.
advertisement
हितेश जैन हा आता अहमदाबाद पोलिसांसाठी 'ॲक्टिव्हा चोरों का बादशाह' बनला आहे. गेल्या 3 वर्षांत त्याने 150 हून अधिक ॲक्टिव्हा चोरल्या आहेत. पण त्याची चोरी करण्याची पद्धत वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
हितेश गाडी चोरून ती कधीच विकत नसे. तो ती गाडी तोपर्यंत चालवायचा जोपर्यंत त्यातील पेट्रोल संपत नाही. एकदा का पेट्रोल संपलं की, तो ती गाडी रस्त्यावरच बेवारस सोडून द्यायचा आणि दुसरी ॲक्टिव्हा चोरायचा. त्याच्यासाठी ही चोरी आता केवळ गरज नव्हती, तर एक 'ऑब्सेशन' (वेड) बनलं होतं. आपल्या पत्नीने दिलेल्या धक्क्याचा बदला तो जणू संपूर्ण शहराच्या ॲक्टिव्हा चोरून घेत होता.
अहमदाबाद लोकल क्राईम ब्रांच (LCB) झोन-1 ने दिलेल्या माहितीनुसार, हितेश हा सराईत गुन्हेगार झाला आहे. त्याच्यावर आतापर्यंत 71 गुन्हे दाखल आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांनी त्याला आतापर्यंत 100 वेळा अटक केली आहे. पण तुरुंगातून बाहेर येताच हितेश पुन्हा 'मिशन ॲक्टिव्हा'वर निघायचा. नुकतीच पोलिसांनी त्याला 101 व्या वेळी अटक केली आहे. शाहीबागच्या किरण अपार्टमेंटमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
हितेशची चौकशी करताना पोलिसांनी जेव्हा त्याच्या चोरीमागचं कारण ऐकलं, तेव्हा तेही थक्क झाले. एका तुटलेल्या हृदयाने एका सामान्य माणसाला शहराचा सर्वात मोठा गाडी चोर बनवलं होतं. सध्या हितेश पोलिसांच्या कोठडीत आहे, पण प्रश्न हाच उरतो की, 101 व्या वेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर हितेशचा हा बदला शांत होईल की तो पुन्हा एकदा नवी ॲक्टिव्हा शोधायला निघेल? हे तर आता त्यालाच माहित.
