बी स्वाती असं हत्या झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तर समाला महेंद्र रेड्डी असं आरोपी पतीचं नाव आहे. समाला आणि स्वाती यांनी गेल्यावर्षी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस हे जोडपं प्रचंड आनंदात होतं. पण हळूहळू यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. समाला आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशयही घेऊ लागला, याच संशयातून वाद झाल्यानंतर समालाने पत्नी स्वातीची हत्या केली. ही घटना तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या मेडिपल्ली इथं घडली.
advertisement
नेमकं काय घडलं?
महेंद्र आणि स्वाती यांनी गेल्यावर्षी वर्षी २० जानेवारी २०२४ रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजाच्या पद्धतीने प्रेम विवाह केला होता. सुरुवातीचे काही दिवस आनंदी गेल्यानंतर त्यांच्या नात्यात लवकरच कटुता आली. महेंद्रच्या मनात स्वातीबद्दल संशय निर्माण झाला, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. एप्रिल २०२४ मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पतीविरोधात हुंडा मागितल्याची तक्रारही दाखल केली होती. गावातील पंचायतीमध्ये हे प्रकरण सोडवले गेले असले तरी महेंद्रच्या मनातील संशय मात्र कायम होता.
क्रूर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. २२ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. याला महेंद्रने विरोध केला. पण स्वाती आपल्या माहेरी जाण्यावर ठाम होती. यामुळे संतापलेल्या महेंद्रने दुसऱ्याच दिवशी, २३ ऑगस्ट रोजी पत्नी स्वातीचा गळा दाबून खून केला.
या क्रूर हत्येनंतर महेंद्रने पुरावा नष्ट करण्यासाठी अमानुष कृत्य केले. त्याने कुऱ्हाडीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले. डोके, हात आणि पाय त्याने मुसी नदीत फेकून दिले, तर मृतदेहाचे धड खोलीतच लपवून ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच मेडिपल्ली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी पती महेंद्रला अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.