नेमकं काय घडलं? सुरूवात कशी झाली?
प्रणय नेहमीप्रमाणे आपली कार चालवत होता. अचानक डॅशबोर्डवर टायर पंक्चरची वॉर्निंग लाईट चमकली. त्वरित त्याने गाडी जवळच्या एका पेट्रोल पंपावर नेली, जिथे एक टायर दुरुस्तीचे दुकान होते. दुकानातील कर्मचाऱ्याने टायर तपासले आणि सांगितले, "साहेब, टायर काढून व्यवस्थित तपासावे लागेल." त्याने तातडीने कारला जॅक लावून वर उचलले, टायरवर साबणाचे पाणी फवारले आणि ब्रश फिरवला.
advertisement
टायरवर बुडबुडे
साबणाच्या पाण्यामुळे टायरवर बुडबुडे दिसू लागले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने टायरमधून एक स्क्रू काढला आणि धक्कादायक दावा केला, "साहेब, तुमच्या टायरमध्ये चक्क चार पंक्चर आहेत!" त्याने पुढे सांगितले की, प्रत्येक पंक्चरसाठी 'मशरूम पॅच' लावावा लागेल आणि त्याची किंमत प्रत्येक पंक्चरमागे तीनशे रुपये म्हणजे एकूण बाराशे रुपये होईल.
प्रणयला संशय आला अन्...
प्रणयला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्याने तिथे दुरुस्ती न करता, एका ओळखीच्या आणि विश्वासू टायर दुकानात जाऊन तो टायर तपासण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचल्यावर जेव्हा टेक्नीशियनने टायर तपासला, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. प्रत्यक्षात, टायरमध्ये फक्त एकच पंक्चर होता! पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने मुद्दामहून इतर 'पंक्चर' केले होते, जेणेकरून बिल वाढवता येईल. टेक्नीशियनने प्रणयला एक विशिष्ट काट्यासारखे टूलही दाखवलं, टूल एका बोटातल्या रिंग सारखी असते. ज्याचा वापर स्कॅमर्स नकली पंक्चर करण्यासाठी करतात आणि पाहणाऱ्यांना वाटते की ते टायर तपासत आहेत.
8 हजाराला चुना
दरम्यान, या हेतूपूर्वक केलेल्या छेडछाडीमुळे प्रणयचा टायर पूर्णपणे खराब झाला आणि त्याला 8000 रुपये खर्चून नवीन टायर बसवावा लागला. प्रणय कपूर इंस्टाग्राम हँडलवरून 6 ऑगस्ट रोजी पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला. त्याला आतापर्यंत 2 लाख 58 हजार व्ह्यूज आणि 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर शेकडो युजर्सनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
