कानपूर दक्षिणचे डीसीपी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, कानपूरच्या देहातमधील सुजनीपूर गावातील रहिवासी विजयश्री यांनी ८ ऑगस्ट रोजी बारा पोलीस ठाण्यात तिची २० वर्षांची मुलगी आकांक्षाच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार दाखल केली होती. आकांक्षा बर्रा येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती, जिथे तिची आरोपीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामद्वारे भेट झाली. त्यांच्यातील संभाषण वाढत असताना, त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कुटुंबातील सदस्यांच्या मते, आरोपीच्या विनंतीवरून आकांक्षा एका नवीन रेस्टॉरंटमध्ये नोकरीला लागली. ती हनुमंत विहार परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाला संशय आला. सुरुवातीला पोलिसांनी हे पळून जाण्याचे प्रकरण मानले, परंतु आईच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीमुळे तपासाला एक नवीन वळण मिळाले.
तपासादरम्यान, प्रियकराची कठोर चौकशी करण्यात आली. त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्समुळे हे भयंकर हत्याकांड उघडकीस आलं. आरोपीनं हत्येची कबुली दिली. आरोपीनं सांगितलं की, त्याचे इतर एका तरुणीशी संबंध होते. याची माहिती आकांक्षाला समजली होती. ज्यामुळे त्यांच्यात वाद झाला.
घटनेच्या दिवशी दोघांमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये भांडण झाले. त्याच रात्री घरी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात आरोपी तरुणाने आकांक्षाला बेदम मारहाण केली आणि तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला बोलावले, तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला आणि तिला दुचाकीवरून बांदा येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिला चिल्ला पुलावरून यमुना नदीत फेकून दिले.
तपासात असंही उघड झाले की, आरोपीचे ज्या तरुणीशी संबंध होते, तिला आरोपीचे आकांक्षा सोबतचं रिलेशनशिप मान्य नव्हतं. त्यामुळे तिने आकांक्षाला सोडावं, यासाठी आरोपीवर दबाव आणला. या दबाव आणि संघर्षाला कंटाळून आरोपीने आकांक्षाची हत्या केली. डीसीपींनी सांगितले की, आरोपीने सुरुवातीला तपासातून सुटण्याचा प्रयत्न केला. तथापि, मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स आणि त्याच्या हालचालींमुळे पोलिसांना सत्य समोर आले. त्यानंतर, आरोपी आणि त्याच्या फतेहपूर येथील साथीदाराला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.