मध्यरात्री आलेल्या चार जणांनी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव इथं एका सरपंचावर हल्ला केला. निलेश देशमुख असं हल्ला झालेल्या सरपंचाच नाव आहे. ते खामगाव तालुक्यातील सुटाळा गावचे सरपंच आहेत. बुधवारी मध्यरात्री ते महामार्गावरील एका हॉटेलसमोर आपल्या बाईकसह उभे होते. यावेळी घटनास्थळी आलेल्या चार हल्लेखोरांनी सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
advertisement
या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक सरपंचाच्या मदतीसाठी धावले. लोकांना येताना पाहून हल्लेखोर पळून गेले. पण लोकांनी यातील एका आरोपीला पकडून ठेवलं. मयूर सिद्धपुरा असं या हल्लेखोराचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? हल्लेखोर नेमके कोण आहेत? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा हल्ला झाल्याची माहिती समजत आहे.
या हल्ल्यात निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील आरोपी मयूरचा कसून तपास केला जात आहे. तसेच फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. बीडमधील संतोष देशमुख प्रकरण ताजं असताना बुलढाण्यात एका सरपंचावर अशाप्रकारे हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
