19 वार केल्याचा दावा
आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणाचे 'बीड कनेक्शन' उघड केले असून, मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड बीडचा असल्याचं समोर आलं आहे. या बॉडीगार्डनेच मंगेश काळोखे यांच्यावर 19 वार केल्याचा दावा करण्यात येत असून, त्याचे काही बड्या राजकीय नेत्यांच्या गटाशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केला आहे.
advertisement
आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो या संशयाला अधिक बळ देत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं. या हत्याकांडामागे राजकीय वैमनस्याची मोठी पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग मनात धरून हा कट रचण्यात आल्याची चर्चा होती. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये काही मोठ्या राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने हे प्रकरण चांगलेच तापलंय.
पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा
दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी आता दबाब वाढू लागला असून, सोमवारी संध्याकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर कँडल मार्च काढण्यात येणार आहे. जोपर्यंत सर्व दोषींना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणाचा तपास कोणता मार्ग घेतो आणि पोलीस काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
