भुलेश्वरमध्ये मिळणाऱ्या या खिचा पापडसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. गेल्या सुमारे पन्नास वर्षांत खाद्यसंस्कृतीत अनेक बदल झाले, नवे पदार्थ आले, नव्या चवी आल्या, तरीही हा पापड त्याच पद्धतीने आणि त्याच चवीने तयार केला जात आहे. त्यामुळे आजही हा पापड खाण्यासाठी लोक आवर्जून थांबतात.
Recipe Video: जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? मग १० मिनीटांत करा ही डीश!
advertisement
या खिचा पापडाची तयारी हीच त्याची खरी ओळख आहे. तांदळाचे पापड आधी भाजले जातात. गरम पापडावर तुपाचा थर दिला जातो. त्यानंतर कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी अशा भाज्या बारीक चिरून पापडावर टाकल्या जातात. या भाज्या तिथेच कापल्या जात असल्यामुळे त्यांचा ताजेपणा जाणवतो.
यानंतर पापडावर हिरवी लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी, लाल लसणाची चटणी तसेच शंकेश्वरी मिरचीपासून तयार केलेली लाल चटणी लावली जाते. यासोबतच हरभरा, मूग, वाटाणा अशा कडधान्यांचा एक थर दिला जातो. शेवटी वरून बारीक शेव पसरवून पापड पूर्ण केला जातो. हा संपूर्ण पापड ग्राहकांच्या समोरच तयार केला जातो.
या खिचा पापडाची किंमत फक्त 40 रुपये आहे. कमी किमतीत, पोटभर आणि चवीदार असा हा पदार्थ भुलेश्वरमधील खाऊगल्लीची ओळख बनला आहे. या खाऊगल्लीमध्ये खिचा पापडसोबतच इतरही अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. तवा फ्राईड राईस, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच तसेच विविध प्रकारच्या भेळी इथे मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांसाठी ही खाऊगल्ली थांबण्याचं ठिकाण ठरते.
फास्टफूडच्या वाढत्या पर्यायांमध्येही भुलेश्वरमधील खिचा पापड आणि इथले इतर पारंपरिक स्ट्रीट फूड आजही तितक्याच आवडीने खाल्ले जातात. हीच गोष्ट या खाऊगल्लीला वेगळी ओळख देणारी ठरते.





