व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेल्या ओळखीतून तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचा एकमेकांवर एवढा जीव जडला की, त्यांनी थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु लग्नानंतर काहीच महिन्यांमध्ये नवऱ्याचे कारनामे बायकोसमोर आले. आपल्या नवऱ्याचे आणखी 2 महिलांसोबत संबंध आहेत, हे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिनं याविरोधात पोलिसांत धाव घेतली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीचा रहिवासी असलेल्या 24 वर्षीय तरुणाची 14 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापूरची रहिवासी असलेल्या एका 28 वर्षीय तरुणीशी सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानं तिला आपण कॉमर्समधून पदवीधर असून आता प्रति महिना 70 हजार रुपये कमवत असल्याचं सांगितलं. दोघांच्या ओळखी वाढल्या, बोलणं वाढलं, मग ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी 14 एप्रिल 2024 रोजी कोल्हापुरातील एका मंदिरात लग्न केलं.
लग्नानंतरचे 2 महिने अगदी नव्याच्या 9 दिवसांसारखे सुखात सरले. परंतु नंतर मात्र पैशांवरून खटके उडायला लागले. नवऱ्यानं घरखर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला. हळूहळू नवरा आणि सासू मिळून तिचा शारीरिक, मानसिक छळ करू लागले. एवढंच नाही, तर सासरच्यांनी तिच्याकडे 5 लाख रुपयांची मागणीही केली.
नवऱ्याचं हे बदललेलं वागणं पाहून बायकोला अगदी जीव नकोसा होऊ लागला, मात्र ती खचली नाही. तिनं यामागचं कारण शोधायला सुरुवात केली. त्यानंतर कळलं की, तिच्या नवऱ्याचे इतर 2 महिलांसोबत संबंध होते. यावरून जाब विचारताच दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. अखेर 28 जानेवारीला तरुणी कोल्हापूरहून जोगेश्वरीच्या घरी राहायला आली. मुंबईला येताच तिनं याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या याबाबत पोलीस तपास सुरू आहे.