हे अपहरण दुसरं तिसरं कुणी नव्हे, तर एका महिलेनं केल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेनं दोन पुरुषांच्या मदतीने हिंगोलीतून एका व्यक्तीचं अपहरण केलं होतं. तिघेहीजण अपहरण झालेल्या व्यक्तीला कारमध्ये कोंबून धारूरच्या दिशेनं घेऊन जात होते. पण पोलिसांना टीप मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. काही घातपात घडायच्या आत पोलिसांनी हे अपहरणकांड उधळून लावलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची सुटका करत महिलेसह दोन पुरुषांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम सावंत नावाच्या व्यक्तीचं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जवळा बाजार परिसरातील तिघांनी अपहरण केलं होतं. धारूर तालुक्यातील एका महिलेसह दोघांनी हे अपहरण केले होते. ते सावंत यांना एका कारमधून धारूरकडे घेऊन जात असताना तेलगाव येथे दिंद्रुड पोलिसांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार थांबवत बळीराम सावंत यांची सुटका केली.
यावेळी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नागराबाई तोंडे या महिलेच्या सांगण्यावरून पैशांच्या व्यवहारातून नामदेव घोळवे आणि बाबुराव बडे या दोघांनी बळीराम सावंत यांचे अपहरण केल्याचे समोर आले. याबाबतची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना दिल्यानंतर, तेथील पथक दिंद्रुड येथे दाखल झालं. पोलिसांनी आरोपींसह अपहरण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या घटनेचा अधिक तपास औंढा नागनाथ पोलीस करत आहेत.