समीर राजू देशमुख असं २७ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील रहिवासी आहे. त्याने मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर पीडित मुलगी काही दिवस शांत राहिली. मात्र आता तिने आपल्या कुटुंबासह मलकापूर पोलीस ठाण्यात जाऊन सगळी आपबिती सांगितली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर आणि अल्पवयीन पीडित मुलगी यांची वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. काही दिवस ऑनलाईन गप्पा मारल्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. पीडित मुलीचं देखील वयाने दुप्पट असलेल्या तरुणावर प्रेम जडलं. पण हे प्रेम पीडित मुलीला चांगलंच महागात पडलं. वर्षभर संपर्कात राहिल्यानंतर आरोपीनं गेल्यावर्षी १२ डिसेंबरला पीडितेला भेटायला बोलावलं होतं. मलकापूरमधील 'हँग आऊट' कॅफेत दोघांनी भेटायचं ठरवलं.
पीडित मुलगी याठिकाणी आरोपीला भेटायला आली असता आरोपीनं पीडितेच्या अज्ञातपणाचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध कॅफेतच लैंगिक अत्याचार केला. या घटनेबद्दल घरच्यांना सांगितलं तर घरचे मारतील, या भीतीने घडलेला प्रकार मुलीने कुणालाच सांगितला नाही. मात्र घटनेच्या दोन महिन्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर पीडितेनं पालकांसह मलकापूर पोलीस ठाण्यात जात आरोपी समीर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
