शिवडी नाका येथील बुमा इंडस्ट्रिज इस्टेटमधील सोन्याच्या दागिन्यांच्या कारखान्यात झालेल्या लुटीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. तपासात स्वतः तक्रारदार सुरक्षारक्षकच या लुटीचा सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. तर, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. रोहितकुमार मौहेंद्रकुमार शर्मा (२०), मनीष राठोड (२४), भगवान पारसकर उर्फ मामा (६०) आणि मंगल कश्यप (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
advertisement
२१ ऑक्टोबरच्या रात्री शिवडीतील सोन्याच्या दागिने बनविणाऱ्या कारखान्यात सुमारे ४० तोळे सोने चोरीला गेले होते. मूळचा कानपूर (उत्तर प्रदेश) येथील रोहितकुमार शर्मा हा त्या कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानेच नवी मुंबईतील आपल्या मित्रांच्या मदतीने लुटीचा डाव रचला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. घटनेच्या रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी मनीष राठोड दोन साथीदारांसह पार्सल देण्याच्या बहाण्याने कारखान्यात शिरला. त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोहितकुमारलाच पायावर मारहाण केली. ही मारहाणदेखील कटाचा एक भाग होता. या मारहाणीमुळे संशयाची सुई सुरक्षा रक्षक असलेल्या रोहितकुमार वळणार नाही, असा कयास होता. ऑफिसमधील ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने लुटून सर्व आरोपी पसार झाले.
एकाच घरात राहायचे आरोपी...
पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता, रोहितकुमारवर संशयाची सुई गेली. अखेर पोलिसांनी त्याच्यासह चौघांना अटक केली. अटक आरोपींपैकी तिघे उत्तर प्रदेशातील, तर उर्वरित आरोपी महाराष्ट्र, बंगाल आणि नेपाळ येथील असल्याचे समोर आले आहे. हे सर्व जण नवी मुंबईतील एका घरात एकत्र राहत होते आणि कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते.
