संबंधित तरुणी डेटिंग ॲप्सवर टार्गेट शोधायच्या. जो पुरुष यांच्या जाळ्यात अडकायचा, त्यांना रेस्टॉरंटमध्ये बोलावलं जायचं. याठिकाणी जास्तीचं बिल दिलं जायचं आणि त्यांची फसवणूक केली जायची. यासाठी या तरुणी रेस्टॉरंटमधील स्टाफशी संगनमत करत. मुंबईच्या बोरिवली येथील एका रेस्टॉरंटमध्ये अशाच एका डेटवर गेलेल्या तरुणाला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्याने पोलिसांना फोन केला तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
११ एप्रिल रोजी पीडित तरुणाचं दिशा नावाच्या एका २२ वर्षीय तरुणीसोबत मॅच झालं होतं. डेटिंग ॲपपवर मॅच झाल्यानंतर त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली. एक दिवसानंतर दोघांनी बोरीवली परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरलं. घटनेच्या दिवशी पीडित तरुण संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास संबंधित हॉटेलमध्ये पोहोचला. तेव्हा दिशा आधीच त्याची वाट पाहत होती. दोघांनी दारू, हुक्का पॉट आणि एनर्जी ड्रिंक्स ऑर्डर केले. यानंतर हॉटेलच्या एका स्टाफने पीडित तरुणाला तब्बल ३५,००० रुपयांचे बिल दिलं. पण एवढं मोठं बिल पाहून तरुणाला धक्का बसला.
त्याने बिल भरण्यास नकार दिला. पण हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याला धमकावला सुरुवात केली. यानंतर तक्रारदाराने पोलीस हेल्पलाइन '१००' वर फोन केला आणि पोलिसांना रेस्टॉरंटमध्ये बोलावले. यानंतर कर्मचाऱ्यांनी बिल कमी करून ३०,००० रुपये केले. तसेच तक्रारदारासोबत डेटवर आलेल्या महिलेने बिलमधील अर्धे पैसे देण्याची तयारी दर्शवली. पण तक्रारदाराने घरी गेल्यावर पाहिलं तर १५,००० रुपयांचे यूपीआय पेमेंट रेस्टॉरंट अकाऊंटवर नव्हे तर वैयक्तिक अकाऊंटवर करण्यात आलं होतं.
यानंतर पीडित तरुणाने पोलिसांत धाव घेतली. सर्व प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी यूपीआय आयडी शोधला आणि तरुणीच्या फोन कॉल रेकॉर्डचीही तपासणी केली. यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता डेटिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली. ज्यात सहा महिला आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, या महिला रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांशी संगनमत करत होत्या. त्यांना जास्त बिलं द्यायला लावायच्या. संबंधिताने पैसे नाही दिले तर कर्मचाऱ्यांकडून धमकावलं जायचं. यानंतर आरोपी महिलांना रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांकडून त्यांचा वाटा दिला जायचा.
