मैत्रीत अडथळा, तरुणीने केली आत्महत्या...
नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे रविवारी दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 19 वर्षीय अंकिता या तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली असतानाच, तिच्या अंत्यसंस्कारादरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. अंकिताचा जवळचा मित्र अनुराग मेश्राम याने सरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
ही घटना 8 जून रोजी दुपारी घडली. अंकिता आणि अनुराग हे एकाच गावातील होते आणि त्यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र त्यांच्या मैत्रीत अडथळे निर्माण झाल्यामुळे अंकिताने टोकाचे पाऊल उचलले. तिच्या आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत "माझ्या मृत्यूसाठी अनुराग जबाबदार नाही" अशी स्पष्ट नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अंत्यसंस्काराच्या वेळी सगळेच हादरले...
अंकिताच्या शवविच्छेदनानंतर दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार सुरू असताना, अचानक अनुराग मेश्राम तिथे पोहोचला. अत्यंत व्याकुळ अवस्थेत त्याने थेट सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये संताप उसळला. काहींनी त्याला तात्काळ सरणावरून ओढून बाहेर काढले आणि चांगलाच चोप दिला.
दरम्यान, अनुरागच्या वडिलांनी आणि भावाने त्याला कामठीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की, अनुरागने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात कुठलेतरी द्रव्य प्राशन केले असावे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती वैद्यकीय अहवालानंतरच मिळणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. एका मुलीने मैत्रीच्या नात्यातील ताणामुळे आयुष्य संपवलं आणि तिचा मित्रही त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याने ही घटना अधिकच वेदनादायक ठरते. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
