हा प्रकार कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाघविला रिसॉर्टमध्ये 15 फेब्रुवारी रोजी घडला. 33 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रीच्या मुखवट्याआड विकृती?
तक्रारीनुसार, पीडितेचा पती आणि आरोपी दीपक अंकुरकर यांचं नातं 2010 पासूनच जवळचं होतं. दोघंही गडचिरोली पोलिस दलात एकत्र शिपाई म्हणून कार्यरत होते. 2017 साली दीपकने विभागीय परीक्षेत यश मिळवत उपनिरीक्षक पद गाठलं.
advertisement
दरम्यान, जानेवारी 2025 मध्ये दीपकने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून गोव्याला सहकुटुंब सहलीचं आयोजन केलं. त्यात पीडित महिला आणि तिचं कुटुंबही सहभागी झालं. याच दरम्यान दीपकने महिलेच्या दिशेने अत्यंत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली आणि नंतर सतत मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, असं महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं.
रिसॉर्टमध्येही अत्याचाराचा केला होता प्रयत्न...
15 फेब्रुवारी 2025 रोजी दीपक आणि त्याचे मित्र त्यांच्या कुटुंबासह नागपूरजवळील वाघविला रिसॉर्टमध्ये गेले होते. त्यावेळी पीडित महिला एका खोलीत एकटी असताना दीपक तिथे शिरला आणि जबरदस्तीने बलात्कार केला, असा गंभीर आरोप आहे. यानंतरही तो महिलेला पुन्हा शरीरसुखाची मागणी करत धमकी देत होता, असंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पीडितेने हे सर्व आपल्या पतीला सांगितलं. त्यानंतर दोघांनी मिळून कोंढाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
शोध मोहीम सुरू
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढाळी पोलिसांचे पथक सध्या मुंबईत तळ ठोकून आहे. आरोपी दीपक अंकुरकर याच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू असून, लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.