मृत तरुणाचे नाव सूरज भलावी (वय 27) असून, तो नियमितपणे दारू गुत्त्यावर जात असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री तो सायरे देशी दारू गुत्त्यावर गेला होता. त्यावेळी दारूचा ग्लास त्याच्या हातून खाली पडून फुटला. या क्षुल्लक कारणावरून गुत्त्यावरील कामगारांनी सुरुवातीला सूरजला शिवीगाळ केली आणि नंतर त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
advertisement
मारहाणीनंतर सूरजला गुत्त्याच्या बाहेर फेकून देण्यात आले. काही वेळाने ही माहिती त्याचा भाऊ सौरभ भलावी याला मिळाली. सौरभने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरजला उपचारासाठी मेवो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र बुधवारी उपचारादरम्यान सूरजचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सौरभ भलावी यांच्या तक्रारीवरून खडगाव पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
