नागपूर: नागपूरमध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा वादंग निर्माण करणारी घटना घडली आहे. नवरात्र उत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला गीट्टीखदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर महिला पोलिसांनी मानवता नगर परिसरात आरोपीची धिंड काढत त्याला जाहीरपणे फिरवले.
advertisement
ऐन नवरात्रीत दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. आरोपीवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव सूरज खोब्रागडे असे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील मंडळाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत गीट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने अटक केली आणि पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार "दुर्गा मार्शल" हा विशेष उपक्रम सुरू आहे. याच आरोपीला महिला पोलिसांनी त्याची धिंड काढली. आरोपीने गुन्हा केलेल्या ठिकाणापासून मानवता नगर परिसरात त्याची धिंड काढण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुंडांवर काही प्रमाणात वचक बसेल अशी चर्चा सुरू झाली आहे.