'राधिका सर्वांसमोर मोकळेपणाने हसायची, पण आतून गुदमरायची...' अशी खळबळजनक माहिती राधिकाची जवळची मैत्रीण हिमांशिका सिंग राजपूतने दिली आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की राधिकाला तिच्याच घरात कैद्यासारखे राहावे लागत होते. तिचे स्वतःवर नियंत्रण नव्हते. तिला कुणाशीही बोलायचं असेल तर याची माहिती पालकांना सांगावी लागत होती.
हिमांशिकाने दावा केला की तिला राधिका यादवबद्दलचे सत्य माहित आहे. राधिका तिची सर्वात जवळची मैत्रीण होती. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून त्यांची खूप जवळची मैत्री होती. व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे की, तिला घरी खूप गुदमरल्यासारखे वाटत होते. तिचे वडील तिच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचे. तिला फोटो काढायला, व्हिडिओ बनवायला खूप आवडत होते. पण हळूहळू सर्वकाही बंद झाले. तिच्या वडिलांना तिचं स्वातंत्र्य आवडत नव्हतं.
advertisement
खोट्या प्रतिष्ठेसाठी तिला मारले
राधिका १८ वर्षांपासून टेनिस खेळत होती, तिने तिच्या मेहनतीने टेनिस अकादमी सुरू केली होती. पण तिच्या स्वातंत्र्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागला. हिमांशिकाचा आरोप आहे की, तिच्या वडिलांनी समाजाच्या भीती आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली वारंवार तिचे स्वातंत्र्य चिरडले आणि शेवटी पाच गोळ्या झाडून तिची हत्या केली.
ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती
हिमांशिकाने सांगितले की, ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती, माझ्या आत्म्यासारखी. मला इतक्या लवकर काही बोलायचं नव्हतं. पण आता गप्प राहिले, तर हा गुन्हा वाटेल. हिमांशिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती म्हणत आहे की, राधिका खूप चांगल्या स्वभावाची होती. राधिकाने स्वतःसाठी मार्ग काढला, पण तिला जगू दिले गेले नाही. तिला मारण्यात आले.