Pandharpur Crime : पंढरपूर मधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत कर्जबाजारीपणा आणि सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेश मारूती कांबळे (वय 64रा. वाखरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नांव आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सूरू केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कांबळे हे पंढरपुरातील वाखरी परिसरात राहतात. कांबळे यांचे दोन मुले आणि मुलीचे लग्न झाल्याने ते बाहेरगावी असतात. तर सुरेश व पत्नी शकुंतला कांबळे हे दोघेच राहतात. दरम्यान शुक्रवारी पहाटे 6.30 वाजता सुरेश कांबळे यांनी पत्नीला अंघोळीसाठी पाणी ठेवायला सांगितले. त्यानुसार शकुंतला कांबळे यांनी पाणी ठेवलं आणि स्वयंपाक करून त्या बसल्या होत्या.
हॉलमध्ये बसून बराचवेळ झाला तरी सुरेश येत नसल्याने शंकुतला यांना चिंता वाटू लागली. तसेच शकुंतला कांबळे यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना फारशी हालचाल करता येत नाही. त्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या मुलाला फोन लावला. त्यानंतर मुलाचा मित्र घरी आला होता.त्याने घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्याल आली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना मयत सुरेश कांबळे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत व्यवसायाची परिस्थिती बिकट झालेली असून खासगी सावकारांचे 6 टक्के व्याजाने पैसे घेतले आहेत. फिरवा फिरवी करून नैराश्य आले असून, त्यातून टोकाचे पाऊल उचलल्याची त्यांनी माहिती दिली. यासोबत त्यांनी 7 जणांची नावे लिहली आणि तसेच संबंधित खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली होती.
'या' कारणामुळे आत्महत्या
सुरेश कांबळे यांचे पंढरपुरात 'दिनेश फूटवेअर' नावाचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. आणि या दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या काही महिन्यापासून व्यवसायात मंदीचे वातावरण होते. विक्री घटली होती आणि उत्पन्नातही मोठी घट झाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते.व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी आणि दुकानातील व्यवहार चालू ठेवण्यासाठी त्यांनी खासगी सावकारांकडून 6 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. कर्जाची हप्ते आणि व्याजाची रक्कम फेडण्यासाठी ते वारंवार फिरवाफिरवी करत होते. मात्र उपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावरील आर्थिक ताण वाढत होता. सावकाराकडून होणाऱ्या सातत्युपुर्ण वसुलीच्या तगाद्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळत चाललं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मानसिक ताण खूपच वाढला होता. या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान कांबळे याच्या चिठ्ठीतील मजकुरानुसार भारत हिलाल, विकी अभंगराव, शिवाजी गाजरे, बंडू भोसले, काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड, संजय व्यवहारे व इरफान अशा 7 सावकारांची नावे होती. तसेच संबंधित सावकार हे जातीवाचक शिवीगाळ करून, धमक्या देत त्रास देत होते, असे त्यामध्ये नमूद केले आहे.त्यामुळे मयताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे ७ जणांविरूद्ध खासगी सावकारकीसह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.