अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीचा डाव साधणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. दोन महिला, एक पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाइल आणि रोख रक्कम जप्त केली आहेत.
advertisement
नेमकं काय घडलं?
साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. काही महिला आणि पुरुष साई मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले. संशयितांना ताब्यात घेतले असता एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. उर्वरित एक पुरुष, दोन महिला आणि एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाइल हस्तगत करण्यात आलाय.
Nashik : एक किचेन सापडलं अन् खरा गुन्हेगार फसला, नाशिकच्या 'त्या' प्रकरणात धक्कादायक खुलासा
बालकाला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे. ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले. या वेशांतराच्या माध्यमातून पोलिस आणि मंदिर सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीत या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झालाय.
दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येत असतात. आधीच परप्रांतीय भिक्षेकर्यांचा विषय ऐरणीवर आलेला असताना आता शिर्डीत परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या देखील सक्रिय असल्याचे समोर आलंय. त्यामुळे या चोऱ्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान शिर्डी पोलिसांसमोर उभं राहिलंय.
