कुत्र्याच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं, पण गंभीर जखमा झाल्यामुळे तिला वाचवता आलं नाही. कुत्र्याने केलेल्या या हल्ल्यानंतर सोसायटीमध्ये तणाव आहे. मुलीचे वडील अजित डाभी एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. सुरूवातीला मुलीच्या वडिलांनी तक्रार करायला तसंच आपल्या मुलीचं पोस्टमॉर्टम करायला नकार दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी रात्री 9 वाजता घडली. सोसायटीमध्ये राहणारी महिला तिच्या कुत्र्याला घेऊन बाहेर जात होती, तेव्हाच मुलीची काकू तिला घेऊन बाहेर आली. सोसायटीमधल्या सिमेंटच्या खूर्चीवर काकू 4 महिन्यांच्या मुलीला घेऊन बसली होती, तेव्हाच कुत्र्याचा ताबा सुटला आणि त्याने चिमुरडीवर थेट हल्ला केला. हा कुत्रा त्याच सोसायटीमधल्या दिलीप पटेल यांचा होता. पटेल यांची मुलगी रॉटविलर कुत्र्याला सोबत घेऊन बाहेर पडली तेव्हा ती फोनवर बोलत होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. फोनवर बोलत असताना लक्ष नसल्यामुळे कुत्र्याचं नियंत्रण सुटल्याचा आरोपही सोसायटीमधील रहिवाशांनी केला आहे.
बाळ-काकू जमिनीवर पडल्या
कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतानाही त्याने 4 महिन्यांची ऋषिका आणि तिच्या काकूवर हल्ला केला. या हल्ल्यात काकू आणि ऋषिका खाली पडले आणि काही सेकंदामध्ये कुत्र्याने ऋषिकावर झडप टाकली आणि तिचे लचके तोडायला लागला. जखमी अवस्थेमध्येच ऋषिका आणि तिच्या काकूला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी ऋषिकाला मृत घोषित केलं. पटेल यांचा कुत्रा तीन ते चार वेळा अशाप्रकारे आक्रमक झाल्याचा आरोप ऋषिकाचे काका राजू डाभी यांनी केला आहे. तसंच कुत्र्याच्या मालकावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.