कर्नाटकातल्या मंगलोर जिल्ह्यातल्या बंगराकुलुर इथल्या एका पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याने स्वतःचा क्यूआर कोड पेमेंटसाठी वापरून 58 लाख रुपयांची फसवणूक केली. तो गेल्या दोन वर्षांपासून क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंटची सर्व रक्कम स्वतःच्या बँक अकाउंटवर ट्रान्स्फर करत होता. पंपाच्या मालकाला हा प्रकार समजताच त्याने पोलिसांत तक्रार केली.
आरोपी मंगलोरमधल्या बंगराकुलुराजवळच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. त्याने दोन वर्षांत 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पंप मालकाने ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी लावलेला क्यूआर कोड काढून त्याने स्वतःचा क्यूआर कोड त्याजागी लावला. त्यामुळे ग्राहकांनी केलेली सर्व पेमेंट्स आरोपी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होत होती.
advertisement
या प्रकरणी पेट्रोल पंप मॅनेजर संतोष मॅथ्यू यांनी कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याने ही तक्रार मंगलोरच्या सायबर क्राइम अँड इकॉनॉमिक स्टेशनमध्ये नोंदवली आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्याला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीने 10 मार्च 2020 ते 31 जुलै 2022 या कालावधीत क्यूआर कोड बदलला होता. या कालावधीत आरोपीने सुमारे 58 लाख रुपये हडप केले.
फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव मोहनदास असून, तो मंगलोरमधल्या बाजपे इथला रहिवासी आहे. तो गेल्या 15 वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर कार्यरत होता. त्याच्याकडे पेट्रोल पंपाची बँकेशी संबंधित आर्थिक कामं आणि व्यवस्थापनाची जबाबदारी होती. मोहनदासने 10 मार्च 2020 रोजी त्याच्या अकाउंटचा क्यूआर कोड पंपावर लावला. पंपाच्या मालकाला ही गोष्ट लक्षात येताच त्याने तपास केला असता त्याला आर्थिक अफरातफर आढळली. मग त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोहनदासला अटक केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.