निनाद गिडवानी यांनी सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध प्रयोग करत आहेत. त्यांनी वैदिक फ्युएल चूल तयार केली आहे. या चुलीत वेस्ट ऑइल किंवा स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं खाद्य तेल वापरून जेवण बनवता येतं. त्यामुळे गॅस किंवा इतर इंधन उपलब्ध नसतानाही स्वयंपाक करणे शक्य होते. या चुलीत विशेष प्रकारच्या कापसाच्या वातांचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये एकूण नऊ दिवे तयार केले आहेत.
advertisement
चुलीच्या मध्यभागी असलेल्या भागात तेल टाकल्यानंतर हे दिवे पेटवले जातात. या दिव्यांमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात तापमान तयार होते आणि त्यावर सहजपणे स्वयंपाक करता येतो. गॅस टंचाई किंवा पर्यायी इंधनाचा शोध घेणाऱ्या नागरिकांसाठी ही चूल उपयुक्त ठरू शकते, असा दावा गिडवानी यांनी केला आहे. ही चूल https://www.ninadspottery.com/ या वेबसाईटवरून मागवू शकता.
गॅसला पर्याय म्हणून ही चूल ठरू शकते उपयुक्त
ही चूल सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा आणि नारळ यांसारख्या कोणत्याही वनस्पती तेलावर चालू शकते. त्यामुळे सौरऊर्जेनंतर पर्यावरणासाठी चांगली आणि शाश्वत इंधनावर चालणारी चूल मानली जाते. या चुलीची रचना अशी आहे की घट्ट किंवा जाडसर तेलदेखील नीट जळते आणि योग्य ज्वाळा तयार होते. त्यामुळे स्वयंपाक व्यवस्थित करता येतो.
शाश्वत इंधन वापरल्यामुळे ही चूल कार्बन न्यूट्रल असल्याचा दावा केला जातो. तसेच गॅसच्या खूप तीव्र ज्वाळेमुळे काही भाज्यांची चव, रंग आणि पोषक घटक कमी होतात. पण या चुलीत ज्वाळा नियंत्रित असल्यामुळे भाज्या नीट शिजतात. या चुलीत एका तासाला सुमारे 50 मिली तेल लागते. म्हणजे जवळपास 7 रुपयांत एक तास स्वयंपाक करता येत असल्याचं निनाद यांनी सांगितलं.





