advertisement

Mumbai News: इराण– इस्रायल संघर्षाचे पडसाद बीएमसीमध्ये, इस्रायलच्या माजी पंतप्रधानाचे नाव दिल्याने गदारोळ

Last Updated:

काळाघोडा परिसरातील एका चौकाला इस्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव दिल्यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे.

News18
News18
मुंबई: जगभरात इराण– इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघालेले असताना मुंबईत मात्र वेगळ्याच ‘जागतिक’ मुद्द्यावर चर्चा रंगली आहे. दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरातील एका चौकाला दिलेल्या इस्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांच्या नावावरून मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे.
जागतिक स्तरावर राजनैतिक समीकरणे बदलत असताना, मुंबई महापालिकेच्या सभागृहात मात्र चर्चा एका चौकाच्या नावावर अडकून पडल्याचे चित्र दिसले. आणि शेवटी या सगळ्या नाट्याचा शेवटही अगदी ‘महाराष्ट्रीयन’ पद्धतीने झाला—प्रस्ताव देणारे नगरसेवकच सभागृहात नसल्यामुळे प्रस्ताव आपोआप बाद!
प्रस्ताव आला… पण प्रस्तावकच गायब
काळाघोडा परिसरातील एका चौकाला दिलेले सिमॉन पेरेस यांचे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद जुनेजा यांनी काही वर्षांपूर्वी दिला होता. प्रशासकीय काळात प्रलंबित असलेले विषय नव्या महापालिकेच्या पहिल्या महासभेत मांडण्यात येत होते.
advertisement
मात्र सभागृहात एक छोटासा ‘तांत्रिक’ अडथळा आला. ज्यांनी प्रस्ताव दिला तेच यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेले नव्हते. त्यामुळे नियमांनुसार त्यांचा प्रस्ताव चर्चेसाठीच आला नाही.
थोडक्यात काय— राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप, भूमिका आणि विचारधारा सगळे तयार होते… फक्त प्रस्तावक नव्हता!
नावावरून पाच वर्षांचे राजकारण
खरं तर या चौकाच्या नावाचा इतिहासही तितकाच रंगतदार आहे.२०१८ मध्ये दक्षिण मुंबईतील बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग आणि सोराबजी टाटा मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील चौकाला सिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रथम आला.
advertisement
त्या वेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने जोरदार विरोध केला. “मुंबईतील रस्त्यांना परदेशी व्यक्तींची नावे देण्याची परंपरा नाही,” असा मुद्दा मांडण्यात आला. परिणामी तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.
मात्र कथा तिथेच संपली नाही.नंतर पुन्हा प्रभाग समित्यांमध्ये आणि गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव आला. पुन्हा विरोध, पुन्हा नकार.
मग २०१९ मध्ये इंडो–इस्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या फेडरेशनने नवा प्रस्ताव दिला. भारत–इस्रायल संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने एका चौकाला सिमॉन पेरेस यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. पण राजकारण तिथेही आडवे आले आणि प्रस्ताव पुन्हा फेटाळण्यात आला.
advertisement
लॉकडाऊन… आणि अचानक फलक
आणि मग आला २०२० चा लॉकडाऊन.मुंबई शांत होती, रस्ते ओस पडले होते, लोक घरी होते… आणि काळाघोडा परिसरात अचानक सिमॉन पेरेस नावाचा फलक उभा राहिला!
या घटनेनंतर समाजवादी पक्षाने संताप व्यक्त करत आरोप केला की विरोधकांना गाफील ठेवून लॉकडाऊनच्या काळात हे नामकरण करण्यात आले. या फलकाविरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र फलक तसाच राहिला… आणि वादही.
advertisement
‘परदेशी नाव नको’चा मुद्दा
काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनी २०२१ मध्ये महापालिकेला पत्र लिहून या नामकरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली.
त्यांचा मुद्दा साधा होता –मुंबईतील रस्त्यांना आणि चौकांना परदेशी व्यक्तींची नावे देण्याची पद्धत नाही. मग सिमॉन पेरेस यांचे नाव का द्यायचे?
राजकीय उपरोध असा की, देशात अनेक ठिकाणी परदेशी व्यक्तींची नावे बदलली जात असताना मुंबईत मात्र नव्याने परदेशी नाव देण्यात आले.
advertisement
अखेर निष्कर्ष काय ?
चार वर्षांनंतर हा विषय पुन्हा महासभेच्या पटलावर येणार होता.राजकीय भूमिका, विरोध आणि भाषणांची तयारी सगळं तयार होतं.
पण शेवटी निर्णय असा झाला की—ज्यांनी प्रस्ताव दिला ते नगरसेवक सभागृहातच नसल्यामुळे विषय कामकाजातून वगळण्यात आला.
आणि परिणामी, काळाघोडा परिसरातील चौकावरचा फलक सध्या तरी तसाच राहणार आहे—सिमॉन पेरेस चौक.
जगात युद्ध… मुंबईत चौक
जगात इराण–इस्रायल संघर्षामुळे जागतिक राजकारण तापलेले असताना मुंबईत मात्र चौकाच्या नावावरून राजकारण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.
advertisement
आंतरराष्ट्रीय कूटनीती, जागतिक संबंध आणि स्थानिक राजकारण यांचा अनोखा संगम या प्रकरणात दिसून आला.
फरक इतकाच—
जगात युद्ध सुरू आहे…
आणि मुंबईत अजूनही चौकाच्या नावावरच राजकारण सुरू आहे !
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: इराण– इस्रायल संघर्षाचे पडसाद बीएमसीमध्ये, इस्रायलच्या माजी पंतप्रधानाचे नाव दिल्याने गदारोळ
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement