२०२३ नंतर आता भारतावर पुन्हा मोठं संकट! WMO चा धक्कादायक अहवाल आला समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
El Nino Effect In Mansoon : यंदा देशात तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यावर्षी उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई : यंदा देशात तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यावर्षी उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. World Meteorological Organization (WMO) च्या अंदाजानुसार, या वर्षाच्या उत्तरार्धात एल निनो परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याचा भारतातील मान्सूनवर परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत तापमान अधिक वाढू शकते. त्यामुळे संभाव्य उष्णतेच्या लाटांसाठी प्रशासन आणि नागरिकांनी तयारी ठेवण्याची गरज असल्याचेही सांगितले जात आहे.
एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम शक्य
WMO च्या अंदाजानुसार, वर्षाच्या अखेरीस एल निनो विकसित होण्याचा धोका आहे. एल निनो निर्माण झाल्यास त्याचा भारतातील मान्सून पावसावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
advertisement
उत्तर भारतात तापमान वाढीचा अंदाज
दरम्यान, India Meteorological Department (IMD) च्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत उत्तर भारतातील तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा ५ ते ७ अंश सेल्सिअस जास्त राहू शकते.
याशिवाय दिल्ली-एनसीआर, गुजरात आणि मध्य प्रदेशसह वायव्य भारतातील मैदानी भागात तापमान सामान्यपेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
पुढील काही दिवसांत हवामान कसे राहील?
आग्नेय द्वीपकल्पीय भारतातही पुढील पाच दिवसांत तापमान सामान्यपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि हवामानतज्ज्ञ माधवन राजीवन यांनी सांगितले की, या हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार हा मध्यम तीव्रतेचा एल निनो असू शकतो. मात्र या टप्प्यावर अंदाजांमध्ये काही प्रमाणात अनिश्चितता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय भागातील समुद्रपृष्ठाच्या तापमानात असामान्य वाढ होण्याची हवामान स्थिती आहे. यामुळे वाऱ्यांचा दाब, पावसाचे स्वरूप आणि हवामानाच्या पद्धतींमध्ये बदल होतात. सामान्यतः याचा परिणाम म्हणून काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच्या उलट स्थितीला 'ला नीना' असे म्हणतात, जी अनेकदा भारतीय उपखंडात चांगल्या मान्सूनशी संबंधित असते.
advertisement
जागतिक तापमानवाढीवरही परिणाम
WMO च्या सरचिटणीस केलेस्टे सौलो यांनी सांगितले की, आगामी काही महिन्यांत हवामान स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. २०२३-२४ मधील एल निनो हा नोंद झालेल्या पाच सर्वात शक्तिशाली घटनांपैकी एक होता आणि २०२४ मधील विक्रमी जागतिक तापमान वाढीत त्याचा मोठा वाटा होता.
एल निनोचा अंदाज का महत्त्वाचा?
तज्ज्ञांच्या मते, एल निनो आणि ला निनासारख्या हवामान घटकांचे हंगामी अंदाज अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण अशा अंदाजांमुळे शेती, आरोग्य, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापनासारख्या हवामानावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना योग्य नियोजन करता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 2:14 PM IST







