पोलिसांनी रात्रभर वाट पाहिली; शेवटी पहाटे समोर आली ती पांढरी फॉर्च्युनर, दरवाजा उघडताच खळबळ, पुण्यात काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मंगळवारी रात्रीपासूनच परिसरात कडक बंदोबस्त ठेवला. रात्रभर वाट पाहिल्यानंतर पहाटे ५ च्या सुमारास संशयित पांढरी फॉर्च्युनर पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
पुणे : पांढऱ्या शुभ्र फॉर्च्युनर गाडीचा वापर करून धक्कादायक कांड करणाऱ्याला पोलिसांनी पकडलं. गाडीचा वापर करून गांजाची तस्करी करणाऱ्या तस्कराला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. तब्बल ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने तस्करीच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. प्रितम रवींद्र कुंजीर (वय ३२, रा. थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रात्रभर रचला सापळा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, थेऊर परिसरात फॉर्च्युनरमधून गांजा विक्रीसाठी येणार आहे. ही माहिती मिळताच पथकाने मंगळवारी (दि. १०) रात्रीपासूनच परिसरात कडक बंदोबस्त ठेवला. रात्रभर वाट पाहिल्यानंतर पहाटे ५ च्या सुमारास संशयित पांढरी फॉर्च्युनर तिथे पोहोचली आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
advertisement
सुरुवातीला चालकाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली. यावेळी त्यात ५३ किलो १४ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा मिळून आला. आलिशान गाडीतून नशेचा असा काळाबाजार सुरू असल्याने पोलीसही चक्रावून गेले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने फॉर्च्युनर, गांजा आणि मोबाईल असा एकूण ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
advertisement
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या पथकाने केली. आरोपी प्रितम कुंजीर याचे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पोलिसांनी रात्रभर वाट पाहिली; शेवटी पहाटे समोर आली ती पांढरी फॉर्च्युनर, दरवाजा उघडताच खळबळ, पुण्यात काय घडलं?






