ठाणे पोलिसांना हायब्रीड गांजा आणि एमडीएमए टॅबलेट्स या अंमली पदार्थांची विदेशातून भारतात तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार ठाणे पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी सापळा रचून थेट कारवाई केली. मुंब्रा येथील जुना टोलनाका, बायपास रोडवरील सिम्बॉयसिस शाळेच्या समोरून बोरिवलीतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 कोटी 37 लाख 40 हजार रुपये किमतीचा 2 किलो 374 ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा आणि 1 लाख 47 हजार रुपयांच्या 19 एमडीएमए टॅबलेट्स आढळल्या. पोलिसांनी तब्बल 2 कोटी 38 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
advertisement
याप्रकरणातील आरोपी मूळचा राजस्थानातील जैसलमेर येथील असून तो सध्या मुंबईतील बोरिवली परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातून अंमली पदार्थांच्या तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट समोर येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ठाणे पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या विशेष पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदर कारवाई केली.
