बिहारच्या गोपालगंजमधून पोलिसांनी एका मर्डर केसमधल्या तीन आरोपींना अटक केली आहे. गोपालगंजचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी चार फेब्रुवारीला या केसचा छडा लावला. त्या आरोपींकडून हत्येसाठी वापरण्यात आलेला कट्टा, काडतुसं, मोबाइल आणि स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आलं आहे. प्रेमप्रकरण हे हत्येमागचं कारण असल्याचं समोर आलं आहे. एसपी स्वर्ण प्रभात यांनी याबाबत सांगितलं, की पाच आरोपींनी ही हत्या केली. त्यातल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. मृत प्रेयसीचा प्रेमी व इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत सोनी कुमारी उत्तर प्रदेशातल्या जौनपूरची रहिवासी होती. जौनपूरचाच रहिवासी असलेल्या रमेश यादव उर्फ राज याच्यावर तिचं प्रेम होतं. लग्न करण्यासाठी सतत ती त्याच्यावर दबाव टाकत होती, मात्र त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्यामुळे तिचा काटा काढण्याकरिता त्यानं कट केला. स्वतःच्या भावासोबत संधान साधून तिला त्याने जौनपूरहून गोपालगंजला भेटायला बोलावलं. तिथे आणखी तिघांसोबत मिळून तीन फेब्रुवारीच्या रात्री तिला मारलं. तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यनंतर तिचा मृतदेह त्यांनी महम्मदपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या सलेहपूर गावाजवळच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गव्हाच्या शेतात फेकून दिला. पोलिसांनी चार फेब्रुवारीला मृतदेह ताब्यात घेतला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक पुरावे जप्त केले आणि तीन आरोपींना अटक केली. त्यात बनुआडीह गावचा रहिवासी असलेला गुलशन कुमार यादव हा प्रियकराचा भाऊ, टेकनवासचे रहिवासी असलेले चंदन कुमार आणि पवन कुमार यांचा समावेश आहे. तर फरार प्रियकर आणि इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हेगारांनी मुलीच्या चेहऱ्यावर गोळी झाडली होती. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोरील मोठं आव्हान होतं. मात्र टेक्निकल सेल व एसआयटीच्या पथकानं मनगटावरच्या घड्याळाच्या मदतीनं हत्येचा तपास सुरू केला. मुलीची ओळख पटली व तिच्या नातेवाईकांनाही बोलावण्यात आलं. मुलीच्या हातावर सोनी लव्ह राजू असं टॅटूनं लिहिलं होतं. त्यामुळे हे प्रेमप्रकरण असल्याची खात्री पोलिसांना पटली. या घटनेत पोलिसांकडे पुरेसे पुरावे असून, पोलीस जलदगतीनं खटला चालवून गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करतील, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. कमी वेळात ही केस सोडवण्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी एसआयटीच्या कामाचं कौतुक केलं. तसंच त्यांच्या संपूर्ण टीमला 10 हजार रोख रुपयांचा पुरस्कारही दिला.
