सरन सिंह असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर पीयूष हत्या झालेल्या १७ वर्षीय पुतण्याचं नाव आहे. आरोपी सरन सिंह याने तांत्रिकाच्या सांगण्यावरून पुतण्याला निर्दयीपणे संपवलं आहे. खरं तर, आरोपी सरन सिंह यांच्या एका मुलाने आणि मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. दोन्ही मुलांनी अशाप्रकारे जीवन संपवल्याने सरन सिंहला धक्का बसला होता. दरम्यान, तो एका मांत्रिकाच्या संपर्कात आला. यावेळी मांत्रिकाने सरन सिंह याला गृहदोष असल्याचं सांगितलं.
advertisement
हा गृहदोष दूर करायचा असेल तर तुझा मुला-मुलीच्या वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असं मांत्रिकाने सांगितलं. मांत्रिकाच्या सांगण्यावरून चुलता सरन सिंह याने आपला पुतण्या पीयूषचा बळी देण्याचा प्लॅन आखला.
शाळेत गेलेला पीयूष परतलाच नाही
सदियापूर गुरुद्वाराजवळ राहणारा १७ वर्षीय पीयूष हा ११वीत शिकत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे करेली सरस्वती शिशु मंदिरात जाण्यासाठी घरातून निघाला. पण, संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीमुळे उघडकीस आले सत्य
तपास सुरू झाल्यावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी, एका महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने एका व्यक्तीला नाल्यात एक मृतदेह फेकताना पाहिले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा तपास केला आणि सीसीटीव्हीमध्ये पीयूषचा चुलता सरन सिंह संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली आणि चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येचा क्रूर प्रकार
आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने सोमवारी पीयूष शाळेत जात असताना त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला आपल्या घरी आणून तांत्रिक पूजा करून त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याने पीयूषच्या शरीराचे तीन तुकडे केले. हात आणि पाय करेहंदाच्या जंगलात फेकले, तर धड नाल्यात फेकून दिले. पोलिसांनी मृतदेह आणि शरीराचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.