मोबाइल ही आता गरजेची आणि खासगी गोष्ट बनलीय. त्यात अनेक आवश्यक व खासगी गोष्टींची माहिती असते. त्यामुळे एकमेकांचे मोबाइल हाताळणं चुकीचं ठरतं. अगदी नवरा-बायकोमध्येही काही वेळा हे लागू होतं. उत्तर प्रदेशात बागपतमध्ये बायकोचा मोबाइल तिच्या परवानगीशिवाय पाहणं नवऱ्याला चांगलंच भोवलं. नवरा मजेमध्ये बायकोचा मोबाइल पाहत होता. इतकंच नाही तर यू-ट्यूबवर गाणी ऐकत होता. तेव्हा पत्नी आली व तिने आपल्या मोबाइलला हात न लावण्यास सांगितलं; पण नवऱ्यानं ऐकलं नाही. त्यामुळे रागावलेल्या पत्नीनं नवऱ्याच्या डोळ्यात कात्री खुपसली. बायकोच्या अशा वागण्याचा अजिबात अंदाज नसलेल्या नवऱ्याला या हल्ल्यामुळे चांगलीच जखम झाली. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलंय.
advertisement
बडौत पोलीस ठाण्याच्या परिसरातल्या विकास कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. नवरा अंकित यानं पत्नी प्रियांकाच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्याचं पोलीस अधिकारी सविरत्न गौतम यांनी सांगितलं. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बडौत पोलीस ठाण्याचे इन्चार्ज जनक सिंह यांनी सांगितलं, की यू-ट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी अंकितनं त्याच्या पत्नीकडून तिचा मोबाइल मागितला होता; पण पत्नीनं द्यायला नकार दिला व सांगितलं की स्वतःच्या मोबाइलवर गाणी ऐक. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. इतकं होऊनही आपला मोबाइल घेतलेला पाहून प्रियांकाला राग आला आणि त्या रागातच तिने अंकितच्या डोळ्यात कात्री खुपसली. यामुळे अंकितच्या डोळ्याला चांगलीच जखम झाली. अंकितच्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. पोलिसांची टीम या घटनेची चौकशी करत आहे.
मोबाइलचा समावेश आता जीवनावश्यक गोष्टींमध्ये होतोय. मोबाइलची नवी मॉडेल्स, त्यात असलेली गोपनीय माहिती व पैसे यामुळे मोबाइल चोरीच्या घटनाही वाढताहेत. नवरा-बायकोतल्या वादाचं कारणही मोबाइल ठरतो. इतकंच नाही, तर मोबाइलमुळे गंभीर गुन्हेही घडू लागले आहेत. समाजातली ही बदलेली परिस्थिती गंभीर तर आहेच; पण विचार करण्यासारखीही आहे.