एक 16 ते 17 वर्षांची एक मुलगी तिचा मोहोल्यातील एक मुलगा मित्र होता. सुरुवातीला तो तिच्याशी प्रेमाने बोलायचा, फिरायला न्यायचा. विश्वास संपादन झाल्यावर त्याने तिला बिअर, सिगारेट आणि नंतर ड्रग्स घ्यायला शिकवलं. काही दिवसांतच ती त्या व्यसनाच्या इतकी आहारी गेली की तिला स्वतःचं भान राहिलं नाही. त्या व्यसनाच्या नादात ती त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवू लागली. पण हे नातं फक्त भावनांपुरतं नव्हतं त्या मुलाने तिचा गैरफायदा घेतला आणि तिला इतरांकडेही ढकललं. मिळालेल्या पैशातून दोघंही ड्रग्स विकत घ्यायचे.
advertisement
PSI मोसमी कटरे यांनी सांगितलं की, मुलीच्या आईने तिला पोलिसांकडे आणल्यानंतर सुरुवातीला ती खूप सामान्यपणे बोलत होती. काही दिवस सुधारलीही, पण त्या मुलाला पुन्हा पाहिल्यावर ती परत त्याच व्यसनाकडे ओढली गेली. शेवटी ती घरातून गायब झाली आणि काही दिवसांनी गर्भवती असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा सत्य उघड झालं तिचं केवळ मानसिक आणि शारिरीक शोषणच नव्हे, तर तिला गुन्हेगारी जगात ढकलण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
PSI मोसमी कटरे म्हणाल्या, "त्यावेळी जेव्हा तिच्या आईने तिला माझ्याकडे आणलं तेव्ही मी तिच्यासोबत याबद्दल बोलत होती तेव्हा ती खूप नॉर्मली चांगली बोलली की, "ठिक आहे मॅडम अब ऐसा नही करुंगी." 5-6 दिवस घरी गेली चांगली राहिली. पण तिने जेव्हा त्या मुलाला पाहिलं तेव्हा तिला सगळं आठवलं, सिगरेट पिण्याची इच्छा झाली. मग ती घरातून गेली, त्याच्यासोबत दोन दिवस गायब राहिली. त्याच्यानंतर तिची आई आली, मग मी तिच्यावर 363 गुन्हा दाखल केला. तो दाखल केल्यानंतर तिने मला काहीच सांगितलं नाही, ती म्हणू लागली की मी एकटीच गेली होती, माझ्या मावशीच्या घरी गेली होती. मग मी तिला चाईल्ड वेल्फेअर कमीटिकडे नेलं. 164 प्रमाणे न्यायालयात नोंदवलं पण तिने काहीच सांगितलं नाही. त्यामुळे ती केस बंद झाली."
पुढे केसबद्दल सांगताना PSI मोसमी कटरे म्हणाल्या, "पण मला मनात पोलिस म्हणून कुठे तरी हे जाणवत होतं की ती मुलगी कुठे तरी खोटं बोलतेय किंवा काहीतरी सांगत नाही आहे मला. मग मी तिला वारंवार पोलिस स्टेशनला बोलवाची, तिच्यासोबत बोलायची, तिच्या आईलापण सांगितलं की तुम्ही हा मोहोल्ला चेंज करा म्हणजे तो मुलगा जो तिला दिसतोय, ज्याला ती भाऊ म्हणते, तोच तिला सिगरेट दारु देतोय, त्यामुळे तुम्ही घर चेंज करा. यानंतर त्यांनी घर बदललं पण त्यामुळे मग ती मुलगी माझ्याकडे येऊ शकत नव्हती, ती दररोज येत नव्हती त्यामुळे तो विषय माझ्याकडून निग्लेक्ट झाला."
"मग काही दिवसांनी त्या मुलीच्या आईचा फोन आला आणि तिने सांगितलं की त्यांची मुलगी प्रेग्नेनंट आहे आणि आता ती घरी देखील नाही. त्यानंतर मग मी त्यांना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला सांगितलं आणि साईड बाय साईड माझा तपास सुरु ठेवला. ती मुलगी आधी राहायची त्या मोहोल्यात मी गेली तेथील इतर लहान मुलांना मी विश्वासात घेतलं, माझ्या गुप्त माहितीदारांना पण कामाला लावलं तेव्हा सत्य समोर आलं. की तो मुलगा त्या मुलीला ड्रग्स द्यायचा. त्यानंतर स्वत: शारिरीक संबंध ठेवायचा, इतरांना ही ठेवायला द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. त्या मिळालेल्या पैशांमधून दोघजणं ही ड्रग्स विकत घ्यायचे." असं PSI मोसमी कटरे म्हणाल्या.
या घटनेनंतर पोलिसांनी आणि चाईल्ड वेल्फेअर कमिटीने त्या मुलीचं समुपदेशन केलं. आज ती मुलगी त्या भयानक काळातून बाहेर आली आहे आणि ब्युटीपार्लरचा कोर्स करत आहे. ती स्वतः म्हणते, “मी चुकीच्या संगतीत होते, पण आता मला पुन्हा शिकायचं आहे, आयुष्य बदलायचं आहे.”
PSI मोसमी कटरे यांनी या अनुभवातून सांगितलं की, “व्यसन ही फक्त नशा नसते, ती तरुणांचं आयुष्य नष्ट करणारी साखळी असते. पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्यात बदल दिसला तर तो दुर्लक्षित न करता त्वरित मदत घ्यावी.” ही घटना केवळ एका मुलीची नाही, तर अनेक पालकांसाठी एक इशारा आहे. कारण चुकीची संगत आणि व्यसन यांचा संगम किती धोकादायक ठरू शकतो, हे याहून जास्त स्पष्ट काहीच सांगू शकत नाही.
