कैलास नागरे असं या शेतकऱ्याचे नाव असून त्याने अनेक दिवसांपासून देऊळगाव रागा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता.मात्र मागणी पूर्ण न झाल्याने तरुणाने आत्महत्या केली आहे.
कैलास नागरे यांना नुकताच राज्य शासनाचा युवा प्रगतशील शेतकरी पुरस्कार देण्यात आला होता. तसेच तो परिसरातील लोकांना आधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण देत होता.शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी त्याने लढा उभारला होता.अनेकदा आंदोलनही केली होती. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने आज सकाळी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.सदर घटनेने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
शेतकऱ्यांनी पालकमंत्री अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ठोस निर्णय जाहीर करेपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना सोपवण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो शेतकरी एकत्र येऊन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
कैलास नागरे यांनी आपले जीवन संपवल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
