याप्रकरणी पुसेगाव (ता. सेनगाव) येथील तरुणावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. आकाश धाबे असं मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर सुमित मोडक असं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका तरुणाने पोलिसाला अशाप्रकारे मारहाण केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील आकाश धाबे याला पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. त्याचा अहवाल नर्सी नामदेव पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानुसार त्याला बाजू मांडण्यासाठी मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याची सूचना दिली होती.
मंगळवारी सकाळी तो पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. त्या ठिकाणी त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मला कोण तडीपार करतो? ते मी पाहतो, असे म्हणून त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी गुन्हे शाखेचे कर्मचारी तेथे आल्यानंतर त्यांनी आकाशला समजावले. मात्र त्याने पोलीस कर्मचारी सुमीत मोडक यांना बेदम मारहाण केली. नंतर खिशातून विषारी औषधाची बाटली काढून औषध घेतले. पोलीस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धाबेवर गुन्हा दाखल झाला आहे.