आज आम्ही तुम्हाला अशाच एका जिद्दी मुलीची गोष्ट सांगणार आहोत, जिने अभिनयाच्या दुनियेला मागे सोडून खाकी वर्दी आणि लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा प्रवास स्वबळावर पूर्ण केला. ही गोष्ट आहे एच. एस. कीर्तना (H.S. Keerthana) यांची.
कीर्तना यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. 'कर्पूरदा गोम्बे', 'गंगा-यमुना', 'उपेंद्र', 'हब्बा', 'लेडी कमिशनर' यांसारख्या अनेक गाजलेल्या कन्नड चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यांची निरागसता आणि सहज अभिनय यामुळे त्या कर्नाटकच्या घराघरात पोहोचल्या होत्या. जेव्हा लोक प्रसिद्धीसाठी धडपडत असतात, तेव्हा कीर्तना यांच्याकडे अमाप यश आणि चाहत्यांचे प्रेम होते. पण त्यांच्या मनात मात्र वेगळंच स्वप्न आकार घेत होतं.
advertisement
आपल्या वडिलांची इच्छा आणि देशसेवेची ओढ यामुळे कीर्तना यांनी एका क्षणी ठरवलं की आता अभिनयाचा पडदा पाडायचा आणि अभ्यासाची पुस्तकं हातात घ्यायची. हा निर्णय सोपा नव्हता. कारण जिथे ग्लॅमर असतं, तिथे परत वळून पाहणं कठीण असतं. तरीही त्यांनी कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. 2011 मध्ये त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि दोन वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून कामही केले. पण ही तर केवळ सुरुवात होती, त्यांचे ध्येय अजून मोठे होते.
कीर्तना यांचे स्वप्न 'आयएएस' (IAS) अधिकारी होण्याचे होते. 2013 पासून त्यांनी यूपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. मात्र, हा रस्ता फुलांचा नव्हता. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल पाच वेळा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. अनेकजण दोन-तीन प्रयत्नांनंतर हार मानतात, पण कीर्तना यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या चुकांमधून धडा घेतला आणि सहाव्यांदा परीक्षेला सामोरे गेल्या. अखेर 2020 मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत 167 वी रँक मिळवून आपले स्वप्न सत्यात उतरवले. एका यशस्वी अभिनेत्रीपासून ते एका कर्तव्यदक्ष IAS अधिकाऱ्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास संघर्षाची पराकाष्ठा सांगणारा आहे.
IAS अधिकारी झाल्यानंतर कीर्तना यांनी मांड्या जिल्ह्यात साहाय्यक आयुक्त म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखवली. सध्या त्या चिक्कमगलुरू जिल्हा पंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा यामुळे त्या आजही चर्चेत आहेत, आता त्या चंदेरी पडद्यामुळे नाही, तर त्यांच्या लोकसेवेमुळे ओळखल्या जातात.
कीर्तना यांचा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. "यशस्वी करिअर असलं तरी, जर तुमची स्वप्नं तुम्हाला स्वस्थ बसू देत नसतील, तर नवीन सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो."
