टिस्काने आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देताना एका खास वाक्याचा उल्लेख केला, तो म्हणजे "मिट्टी पाओ" म्हणजेच, झालेलं विसरून त्यावर माती टाका आणि पुढे चला. पम्मी अरोरा यांच्या जीवनाचा हा मंत्र होता. आयुष्यात कितीही तक्रारी असोत किंवा कोणाबद्दल राग असो, त्या कधीही मनात गाठ बांधून ठेवत नसत. "कोणाबद्दलही वाईट मत न बनवता, चेहऱ्यावर कायम हसू ठेवून जगणं कसं असतं, हे आईने मला शिकवलं," असं टिस्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
कलेचा वारसा आणि 'अरोरा मॅम'चा दरारा
टिस्काच्या मते, तिच्यातील अभिनयाची ओढ, गोष्टी सांगण्याची कला आणि रंगांची आवड ही सर्व तिच्या आईचीच देणगी आहे. पम्मी अरोरा या केवळ एक आईच नव्हत्या, तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या 'अरोरा मॅम' होत्या. शाळेतील मुलांवर आईसारखं प्रेम करणाऱ्या आणि त्यांना मायेने घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. पम्मीजींचा एक विचार टिस्काच्या आयुष्याचा आधार बनला, "माणसाच्या हातात 'नाही' तर आधीपासूनच असतं, त्यामुळे घराबाहेर पडा आणि 'हो' मिळवण्यासाठी प्रयत्न करा! (इंसान के पास ‘ना’ तो पहले से ही है, इसलिए बाहर जाकर ‘हां’ हासिल करने की कोशिश करनी चाहिए.)"
कॅन्सरशी झुंज देणं सोपं नसतं, पण पम्मी अरोरा यांनी मृत्यूलाही हसत सामोरं जाण्याचं धैर्य दाखवलं. टिस्काने सांगितलं की, शेवटच्या दिवसांत रुग्णालयातील आयसीयूमध्ये असतानाही, जेव्हा गाणी वाजत असत, तेव्हा त्या तालावर आपले खांदे हलवून संगीताचा आनंद घेत असत. त्यांची ही जिद्द पाहून डॉक्टरही थक्क व्हायचे. मृत्यू समोर दिसत असतानाही जगण्याचा हा उत्साह त्यांनी कधीच कमी होऊ दिला नाही.
आईची परंपरा नातवापर्यंत पोहोचणार
"आईच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असला, तरी तिची ही जिद्द आणि विचार माझी मुलगी तारा हिच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील," असा विश्वास टिस्काने व्यक्त केला आहे. टिस्का म्हणते की, आईच्या शिकवणीनुसार ती दु:खावर माती टाकेल आणि आईची ती निरागस हाक आपल्या आठवणींत कायम जिवंत ठेवेल.
