बिग बॉसच्या घरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. घरात गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः राकेश बापटने बनवली आहे. राकेश हा एक उत्तम चित्रकार आणि मूर्तीकार असल्याचं याआधीही त्याने अनेकदा दाखवून दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राकेश काहीसा उदास दिसत होता. घरातील तणावाचा त्याच्यावरही परिणाम झाला होता. मात्र बाप्पाची मूर्ती घडवताना राकेश पुन्हा एकदा हसताना दिसला.
advertisement
राकेशने साकारलेली मूर्ती आणि प्राजक्ताच्या भजनाने बिग बॉसच्या घरात मंगलमयी वातावरण निर्माण केलं आहे. समोर आलेल्या प्रोमोला प्रेक्षकांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी घरातील सर्व 17 सदस्य एकत्र आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान स्पष्ट दिसत होतं. बाप्पा घरात येताच काही दिवसांपासून बिघडलेलं वातावरण क्षणात बदललं. राग, मतभेद आणि रूसवे-फुगवे जणू काही क्षणात दूर झाले. घरात सकारात्मक ऊर्जा पसरलेली पाहायला मिळाली.
घरात आधीच 17 सदस्य असताना गणपती बाप्पांच्या रूपाने घरात 18 वा नवा सदस्य आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाप्पांच्या आगमनाने घरात शांतता, एकोप्याची भावना आणि प्रसन्नता नांदू लागली आहे. सदस्य एकमेकांसोबत हसत-खेळत, मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात साजरा होणारा हा उत्सव प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे. राकेश बापटच्या हातून साकारलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणि त्यामुळं बदललेलं घरातील वातावरण या आठवड्याचा सर्वात लक्षवेधी क्षण ठरला आहे.
