कृष्णासाठी दुष्यंतची कसरत
मालिकेची नायिका कृष्णा ही अस्सल शेतकरी कन्या आहे. तिच्यासाठी तिची शेती हीच तिचं सर्वस्व आहे. सुरुवातीला दुष्यंत आणि कृष्णाच्या विचारात जमीन-अस्मानाचा फरक होता. दुष्यंतला गावाकडचं आयुष्य कधीच भावलं नव्हतं. पण म्हणतात ना, प्रेमात माणूस काय करेल याचा नेम नाही. कृष्णाची मनधरणी करण्यासाठी आणि तिच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करण्यासाठी दुष्यंतने आता थेट शेतात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा फक्त शेतीचा प्रवास नसून, एका अहंकारी माणसाचा मातीशी नातं जोडण्याचा भावनिक प्रवास आहे.
advertisement
अभिषेक रहाळकरचा नवा अनुभव
या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता अभिषेक रहाळकर कमालीचा उत्साही दिसला. तो म्हणतो, "दुष्यंतला सुरुवातीला मातीची भीती आणि शिसारी वाटायची, पण कृष्णामुळे ती भीती आता आदरात बदलत आहे. कृष्णाला आपलंसं करण्यासाठी तो तिच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणार आहे. वैयक्तिकरित्या मला शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आदर आहे. ते अहोरात्र कष्ट करतात म्हणून आपल्या ताटात अन्न येतं. एका अभिनेत्याच्या निमित्ताने मला हे शेतकरी आयुष्य जवळून अनुभवायला मिळतंय, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो."
दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यात येणार गोडवा?
दुष्यंत आणि कृष्णा यांच्यात सध्या जो दुरावा आहे, तो या 'शेतकरी' अनुभवामुळे कमी होईल का? दुष्यंत चिखलात काम करताना कृष्णाला त्याची दया येईल की त्याचं हे रूप पाहून ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडेल? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल. दुष्यंतचा हा बदल कृष्णाला नक्कीच भारावून टाकणारा ठरणार आहे.
कधी पाहता येईल?
जर तुम्हालाही दुष्यंत आणि कृष्णाची ही आगळीवेगळी केमिस्ट्री आणि बांधावरची प्रेमकथा अनुभवायची असेल, तर 'हळद रुसली कुंकू हसलं' पाहायला विसरू नका. दररोज दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.
