मनसे सभासद नोंदणीत अभिनेता पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे आणि प्रसिद्ध ऍड गुरु भरत दाभोळकर यांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारत पक्षाला पाठिंबा दर्शवला.या वेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात कलाकारांनी पक्षाच्या कार्याबद्दल आपले मत व्यक्त करत मनसेच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडली.
advertisement
या कार्यक्रमादरम्यान ऍड गुरु भरत दाभोळकर म्हणाले, "राज ठाकरे अनेक वर्षांपासून मुंबईसाठी चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विविध अभियानांमध्ये सहभागी होण्याची आपली तयारी कायम असते. जर एखादा व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. एखाद्या पक्षात प्रवेश करण्यापेक्षा कधी कधी बाहेरूनही मार्गदर्शन करता येते. एखादी व्यक्ती पक्षात नसली तरीही ती योग्य मार्गदर्शन देऊ शकते."
मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाने राज्यभर मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी सभासदत्व स्वीकारल्याने या अभियानाला नवे बळ मिळालं आहे.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे मनसेच्या अभियानाला वेग मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी पक्षाला दिलेल्या या पाठिंब्यामुळे आगामी काळात मनसेच्या उपक्रमांना अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
