कोल्हापूर : कलानगरी कोल्हापूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर ओटीटी सोहळ्यात कोल्हापूरच्या ‘देशकरी’ लघुपटाला विशेष ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आले. दिग्दर्शक संजय दैव यांनी साकारलेला हा लघुपट जय जवान जय किसान या संकल्पनेवर आधारित असून, एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाच्या सैनिकांवरील भावनांना लहान मुलाच्या दृष्टिकोनातून प्रभावीपणे मांडला आहे.
advertisement
अनेक पुरस्कारांवर कोल्हापूरची मोहोर:
‘देशकरी’ लघुपटाने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून, 15 ठिकाणी नामांकन मिळाले आहे. कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती संजय दैव यांची असून पटकथा वैभव कुलकर्णी यांनी लिहिली आहे. छायांकन विक्रम पाटील यांचे, तर संगीत ऐश्वर्य मालगावे यांचे आहे.
स्थानीय कलाकारांचा प्रभाव:
या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे झाले असून, त्यात स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांचा समावेश आहे. चित्रीकरणासाठी 35 गावांचा सर्वे करण्यात आला होता.
दिग्दर्शक आणि संगीतकारांचे अनुभव:
दिग्दर्शक संजय दैव म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या कष्टांवर आधारित कथा रचताना शेवटच्या ट्विस्टवर विशेष मेहनत घेतली." तर संगीतकार ऐश्वर्य मालगावे यांनी सांगितले की, "शेतकरी आणि सैनिकांच्या भावनिक संघर्षाला संगीतातून मांडणे खूप मोठे आव्हान होते."
कोल्हापूरच्या दोन लघुपटांचा अंतिम फेरीत समावेश:
‘देशकरी’व्यतिरिक्त स्वप्नील पाटील यांचा ‘मधुबाला’ लघुपटही फिल्मफेअरच्या अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम दहामध्ये कोल्हापूरच्या दोन लघुपटांचा समावेश होणे ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.