निखिल बने सध्या त्याच्या युट्यूब व्लॉगसाठी 'कोको राईड' नावाची सीरिज करत आहे. याच सीरिजच्या शूटसाठी तो कोकणात प्रवास करत आहे. मंडणगड-दापोली परिसरात फिरत असताना हिंमतगडाकडे जाताना हा अपघात झाला. गावातील एका उंच चढावरून जात असताना निखिलची बाईक अचानक घसरली. रस्ता घसरडा असल्यामुळे त्याला गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि तो खाली पडला. या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.
advertisement
( सेटवर भेटली अन् दिरासोबत जमवलं लग्न, 'ठरलं तर मग'च्या सायलीची सासू आहे या अभिनेत्रीची जाऊ )
अपघातानंतर तिथून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत निखिलची मदत केली. विशेष म्हणजे रस्त्यावर खारी-बटर विकणाऱ्या एका व्यक्तीने त्याला उभं राहण्यास मदत केली. तसेच गावातील काही महिलांनी त्याला पाणी देत विचारपूस केली. या सगळ्या प्रसंगामुळे कोकणातील माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन घडलं असं म्हणत निखिल बने भावुक झाला.
निखिल बनेने भावूक होत स्थानिकांचे आभार मानले. तो म्हणाला, "कोकणातल्या लोकांचं हेच वैशिष्ट्य आहे. मला मदत करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. त्यांची नावं मला माहिती नाहीत पण त्यांचे चेहरे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही".
निखिल बनेचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "राइड सेफ भावा." दुसऱ्यानं लिहिलंय, "सांभाळून रे बाबा. बाईक चालवताना काळजी घे." आणखी एकानं लिहिलंय, "काळजी घे मित्रा आणि तुझा पुढचा प्रवास सुखाचा जावो हीच हरिहरेश्वरा चरणी प्रार्थना ."
