मराठी 'फुलवंती' आता हिंदीमध्ये
स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित 'फुलवंती' चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. मराठी प्रेक्षकांनी प्राजक्ता आणि गश्मीरच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला आणि चित्रपटातील गाण्यांना प्रचंड प्रेम दिले. नुकतेच प्राजक्ता आणि गश्मीर इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे चाहत्यांशी जोडले गेले आणि त्यांनी ही गोड बातमी दिली. प्राजक्ताने खुलासा केला, "चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि त्यानंतरही नाना पाटेकर आणि सचिन पिळगांवकर यांच्यासारख्या दिग्गजांनी हा सिनेमा हिंदीमध्ये डब का केला नाही, अशी विचारणा केली होती. खरंतर थोडा उशीर झाला आहे. पण आता हा सिनेमा हिंदी भाषेत पाहता येणार असून या चित्रपटाची गाणीसुद्धा हिंदीमध्ये डब केलेली आहेत. त्यामुळे आता हिंदी लावणीवरदेखील लोक नाचू शकणार आहेत."
advertisement
OTT वर पाहता येणार 'हिंदी फुलवंती'
मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर, आता हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठीही उपलब्ध झाला आहे. गश्मीर आणि प्राजक्ताने सांगितले की, 'फुलवंती' चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. गश्मीरने यावेळी चाहत्यांचे आभार मानले आणि सांगितले, "हा चित्रपट आता हिंदीमध्ये डब केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदीमध्येसुद्धा जे डबिंग केले आहे, ते मी आणि प्राजक्ताने स्वतःच केले आहे. त्यामुळे तुम्हाला आमच्याच आवाजात हिंदीत चित्रपट पाहता येईल."
'फुलवंती' या चित्रपटात प्राजक्ता आणि गश्मीरसोबतच प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषिकेश जोशी, सविता मालपेकर, समीर चौघुले यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांना प्राजक्ता आणि गश्मीरची केमिस्ट्री खूप आवडली होती. कथेबरोबरच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. अशातच आता हा सिनेमा अमराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
