मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीरा वासुदेवन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मीरा यांनी तिसऱ्यांदा घटस्फोट घेत, आपण पुन्हा एकदा सिंगल झाल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सोशल मीडियावरुन त्यांचे लग्नाचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत.
इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली घोषणा
मीरा वासुदेवन यांनी त्यांचा तिसरा पती विपिन पुथियंकाम यांच्यापासून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. मीरा यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "मी, अभिनेत्री मीरा वासुदेवन, अधिकृतपणे जाहीर करते की मी ऑगस्ट २०२५ पासून आता सिंगल आहे. माझ्या आयुष्याच्या सर्वात अद्भुत आणि शांत टप्प्यात मी आहे." त्यांनी ही घोषणा करताच, इन्स्टाग्रामवरून विपिनसोबतचे लग्नाचे सर्व फोटो आणि पोस्ट तात्काळ डिलीट केल्या.
advertisement
अखेर तिसरं लग्नंही आलं संपुष्टात
मीरा वासुदेवन आणि विपिन पुथियंकाम यांची भेट मीरा यांच्या 'कुटुंबविलक्कू' या मालिकेच्या सेटवर झाली होती. लगेचच त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी गेल्या वर्षी कोईम्बतूर येथे लग्न केले होते. मात्र, एका वर्षाच्या आतच हा संसार मोडला. यापूर्वी २००५ मध्ये मीरा यांनी सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते, पण २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी अभिनेता जॉन कॉक्केन यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगाही आहे, पण २०१६ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.
कोण आहे मीरा वासुदेवन?
२९ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत जन्मलेल्या मीरा वासुदेवन यांनी तमिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम भाषिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. २००५ मध्ये आलेल्या 'तन्मात्र' या मल्याळम चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला न्यू फेस अवॉर्ड मिळाला होता. तर 'उन्नई सरणडैन्थेन' या तमिळ चित्रपटासाठी त्यांना तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यांनी 'गोलमाल' (२००३) आणि 'रूल्स: प्यार का सुपरहिट फॉर्म्युला' (२००३) या हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. मीरा यांनी आता सिंगल राहत कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
