मराठी सिनेमात भयपटांचं प्रमाण तुलनेत कमी असलं, तरी जेव्हा काहीतरी भन्नाट येतं, तेव्हा ते चांगलीच चर्चा रंगवून जातं. ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ चित्रपटाचं नुकतंच मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आणि त्याने चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे.
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं असून, अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात कोणते कलाकार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथेप्रमाणेच कास्टिंगचं रहस्यसुद्धा चाहत्यांच्या औत्सुक्यात भर टाकत आहे.
advertisement
काय सांगतो मोशन पोस्टर?
मोशन पोस्टरवर एक नजर टाकली तरी मनात अनेक प्रश्न उमटतात. बाहुली आणि तिच्या शरीरावर टोचलेल्या टाचण्या – ही दृश्यं करणी, जारण आणि जादूटोणा सारख्या गूढ गोष्टींचा संदर्भ देतात का? विवाहित महिलेच्या हातात ही बाहुली का आहे? हा भूताचा सिनेमा आहे की मानवी भावनांच्या गुंतागुंतीचा? उत्तरं मिळायला वेळ लागणार असला, तरी प्रश्नांनी आधीच वातावरण गडद केलं आहे.
दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते सांगतात, “हा केवळ भयपट नाही, तर एक कुटुंबाची कथा आहे. करणी आणि जारण यासारख्या गोष्टींमुळे एका घरावर काय परिणाम होतो, ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा चित्रपट मानवी भावनांचा आणि त्यांच्या छुप्या बाजूंचा शोध घेतो.”
तर निर्माते अमोल भगत म्हणतात, “या चित्रपटात भय, रहस्य आणि भावना यांचं अनोखं मिश्रण आहे. मराठी प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘जारण’ निश्चितच एक वेगळा अनुभव देईल.”
६ जूनला उलगडणार गूढ
या चित्रपटाची कथा नक्की काय असेल? जारण खरंच अस्तित्वात असतं का? विवाहितेच्या हातातील बाहुलीचं सत्य काय आहे? हे सगळं जाणून घ्यायचं असेल, तर ६ जून २०२५ पर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत, मोशन पोस्टरनं उभ्या केलेल्या रहस्याच्या वादळात प्रेक्षक गारूड झाल्याशिवाय राहणार नाहीत!