नुकतंच 'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स' सोहळा दिमाखात पार पडला. मात्र, या सोहळ्यातील एका आक्षेपार्ह विधानामुळे संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये प्रसिद्ध होस्ट सौरभ द्विवेदी आणि कॉमेडियन झाकीर खान यांनी राजपालच्या चेक बाऊन्स प्रकरणावर जाहीर टोमणा मारला. यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांनाही धारेवर धरलं, पण आता स्वतः राजपाल यादवने समोर येत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
advertisement
अवॉर्ड शोमध्ये नेमकं काय घडलं?
शोमधील एका स्कीटदरम्यान राजपाल यादव जागतिक अर्थव्यवस्था आणि रुपयाच्या घसरत्या किमतीवर भाष्य करत होते. गप्पांच्या ओघात सौरभ द्विवेदी यांनी अचानक राजपाल यांच्या ९ कोटींच्या कर्जाचा आणि तुरुंगवासाचा विषय काढला. सौरभ म्हणाले, "राजपाल भाई, डॉलर आणि रुपया कितीही वर-खाली झाला, तरी तुम्हाला तेवढेच पैसे परत करावे लागतील जेवढे तुम्ही उधार घेतले आहेत!" सौरभ यांच्या या वक्तव्यानंतर एकच शांतता पसरली. अशातच ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नेटकऱ्यांनी सौरभ यांना धारेवर धरलं. फक्त नेटकरीच नाही, तर इंडस्ट्रीतील बडे सेलेब्स, जसे की सलमान खान आणि मिका सिंग यांनी राजपाल यादव यांची बाजू घेत आपली भक्कम भूमिका मांडली.
दरम्यान, आता खुद्द राजपाल यादव यांनी समोर येत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. राजपाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, "नमस्कार मित्रांनो! सौरभ आणि झाकीर हे माझ्या भावासारखे आहेत. कलाकारांच्या जगात अनेकदा आपण एखादा सीन एका विचाराने लिहितो, पण प्रेक्षकांपर्यंत त्याचा वेगळा अर्थ पोहोचतो. सौरभने माझं नेहमीच सन्मान केला आहे. त्या रात्रीही त्याने माझ्यासाठी टाळ्या वाजवून घेतल्या होत्या. कृपया त्यांना ट्रोल करू नका, त्यांना दुखावणं म्हणजे मला दुखावणं आहे. मी सौरभ आणि झाकीरवर खूप प्रेम करतो."
राजपालच्या या विधानाने चाहत्यांची मनं जिंकली असून अपमान होऊनही आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या त्याच्या वृत्तीचं कौतुक होत आहे.
काय आहे चेक बाऊन्स प्रकरण?
फेब्रुवारी २०२६ मध्ये ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात राजपाल यादवला तिहार जेलची हवा खावी लागली होती. १६ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मिळाला आणि सध्या ते जामिनावर बाहेर असून आपले शूटिंगचे प्रोजेक्ट्स पूर्ण करत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यांना पुन्हा कोठडीत न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
