मराठी सिनेसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शकही आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत शेखर बापू रणखांबे यांचे नाव जोडले जात आहे. मुंबईत संघर्षाची वाट चालत शेखर बापू रणखांबे यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लंबिंगसारखी कामे केली. त्यानंतर त्यांचे रंगभूमीशी नाते जुळले आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथनाची, अभिनयाची आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी जवळून अनुभवली.
advertisement
त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनाकडे कल वळवला. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून अनुभव मिळवला व 'रेखा', 'पॅम्पलेट'सारख्या शॉर्ट फिल्म्स केल्या. पॅम्पलेट या शॉर्ट फिल्मची निवड 'इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल'मध्ये इंडियन पॅनोरमा सेक्शन या विभागात झाली. तसेच 'इंटरनॅशन डॉक्युमेंट्री व शॉर्ट फिल्म फेस्टिवल ऑफ केरला' मध्ये या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला. त्यांच्या 'रेखा' या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती. याही शॉर्ट फिल्मची निवड 'इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल'च्या इंडियन पॅनोरमा सेक्शन विभागात झाली होती.
शेखर बापू रणखांबे यांची इच्छा सिनेमा करण्याची होती. 'रुबाब'च्या निमित्ताने ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. गावाकडची प्रेमकहाणी हा विषय परिचित असला तरी, ‘रुबाब’ची मांडणी व दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. या सिनेमाची कथा केवळ प्रेमाभोवती फिरणारी नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास यावर भर देणारी आहे.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले "रुबाब हा सिनेमा माझ्या जवळचा आहे. कारण, हा माझा पहिला सिनेमा आहे. मी झी स्टुडियोज व निर्माते संजय झणकर यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे मला योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले. तसेच सिनेमातील कलाकारांनीदेखील उत्तम कामगिरी करून या कथेला न्याय दिला आहे. 'रुबाब' ही केवळ लव्हस्टोरी नसून त्यात एक वेगळेपणा आहे. टीझरला मिळणार प्रतिसाद बघून आनंद होतो. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल याची मला खात्री आहे." हा सिनेमा 6 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
