श्रेया घोषालने देशातील परिस्थिती आणि तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता तिचं आगामी कॉन्सर्ट रद्द केलं आहे. 10 मे 2025 रोजी मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये होणारा‘ऑल हार्ट्स टूर’चा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे चाहते निराश होऊ शकतात पण सध्या देशातील परिस्थिती महत्त्वाची आहे.
रवीना टंडनच्या 'मिसाइल'ने पाकिस्तानात खळबळ, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची उडवलेली झोप
advertisement
श्रेया घोषालने ही माहिती स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमध्ये ती म्हणते, “माझ्या प्रिय चाहत्यांनो, जड अंतःकरणाने सांगते आहे की हा कार्यक्रम सध्या आपल्या देशात सुरु असलेल्या परिस्थितीमुळे पुढे ढकलला जात आहे. एक कलाकार म्हणून मला हा शो खूप खास वाटतो, पण एक नागरिक म्हणून, देशासोबत उभं राहणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे.”
तिच्या या निर्णयामुळे अनेक चाहते थोडे नाराज असले तरी, तिच्या देशभक्तीच्या भावना पाहून तिचं कौतुकही होत आहे. श्रेया पुढे म्हणते, “हा शो रद्द केलेला नाही, फक्त पुढे ढकललेला आहे. आपण लवकरच भेटू, आणि अधिक जोमाने मैफिल गाजवू.”
श्रेया घोषालने हेही स्पष्ट केलं आहे की, जे प्रेक्षक आधीच तिकीट खरेदी करून ठेवले आहेत, त्यांच्या तिकिटांवर पुढील नवीन तारखेसाठी प्रवेश मिळेल. BookMyShow हे या कार्यक्रमाचे अधिकृत तिकीट भागीदार असून, सर्व तिकीटधारकांशी लवकरच संपर्क साधून नवीन तारखेची माहिती देण्यात येईल. श्रेया घोषालने आपल्या पोस्टचा शेवट करताना चाहत्यांना आवाहन केलं, “तोपर्यंत कृपया सुरक्षित राहा, एकमेकांची काळजी घ्या. आपल्या प्रेमासाठी आणि समजुतीसाठी धन्यवाद.”