चंद्रकांत पाटील यांनी दिले होते कारवाईचे निर्देश
अपघातानंतर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी केवळ कारवाईचीच नव्हे, तर गौतमी पाटीलला त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. प्रकरण वाढल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन करून तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. यामुळे गौतमीच्या अडचणी वाढणार असे स्पष्ट दिसत होते.
advertisement
गौतमी पाटीलच्या नव्या व्हिडीओमुळे खळबळ
या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात एक मन हेलावून टाकणारा पण तितकाच अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. गौतमी पाटीलच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये खुद्द गौतमी, अपघातग्रस्त रिक्षाचालक आणि त्यांचे कुटुंबिय एकत्र दिसत आहेत. यावेळी रिक्षाचालकाच्या मुलीनेच कॅमेऱ्यासमोर सांगितले की, "वडिलांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर गौतमी पाटीलने स्वतः आमच्या घरी येऊन वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली आणि आमची विचारपूस केली. आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत."
आता कायदेशीर लढाईचे काय?
गौतमी पाटीलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असल्या तरी, गौतमीने सहानुभूती मिळवली की, केवळ कायदेशीर पेचातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, याची चर्चा सुरू आहे. रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गौतमीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली तरी, हे कायदेशीर प्रकरण थांबणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.