नेमकं काय घडलं त्या रात्री?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली आहे, जे रंग शक्तीच्या उपासनेचं प्रतीक मानले जातात. कपाळावर 'जय माता दी' लिहिलेली पट्टी आणि हातात देवीचं निशाण घेतलेल्या सुधाजी सुरुवातीला भजनात तल्लीन होत्या. मात्र, जसा भजनाचा वेग वाढला, तसा त्यांच्या हालचालीत एक वेगळाच वेग आला.
advertisement
त्यांच्या शरीराच्या हालचाली इतक्या तीव्र झाल्या की, त्या स्वतःवरचं नियंत्रण गमावल्यासारख्या वाटत होत्या. हा भक्तीचा आवेश पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांना घट्ट पकडून धरलं, जेणेकरून त्यांना इजा होऊ नये. सुधाजी जणू एका ट्रान्समध्ये गेल्या होत्या. अनेकांनी याला 'अंगात येणं' किंवा 'आध्यात्मिक संचार' असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. श्रद्धाळू प्रेक्षकांनी याला "भक्तीची सर्वोच्च अवस्था" म्हटलं असून, आईच्या दरबारात सुधाजी कशा भारावून गेल्या आहेत, याचं कौतुक केलंय. दुसरीकडे, काही लोकांनी "अशा गोष्टींना अंधश्रद्धेचं स्वरूप देऊ नये," असं मत मांडलं आहे. मात्र, सुधा चंद्रन यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं असं रुप पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
सुधा चंद्रन यांचा प्रवास हा नेहमीच प्रेरणेचा राहिला आहे. 'नाचे मयुरी' चित्रपटातून आपल्या जिद्दीची कहाणी जगाला सांगणाऱ्या या नृत्यांगनेने 'काहीं किसी रोझ', 'नागिन' आणि 'माता की चौकी' यांसारख्या मालिकांमधून घराघरात स्थान मिळवलं. योगायोगाने, त्यांनी अनेकदा पडद्यावर देवीची किंवा अनिष्ट शक्तींविरुद्ध लढणाऱ्या पात्रांची भूमिका साकारली आहे. कदाचित खऱ्या आयुष्यातही त्या देवीच्या मोठ्या भक्त असल्यामुळेच हा भावनिक उद्रेक झाला असावा, असं बोललं जातंय.
