कौतुकासोबतच 'मॉर्फिंग'चे घाणेरडे प्रकार
गेली २२ वर्षे मराठीसह हिंदी-कन्नडमध्ये काम करणाऱ्या गिरिजाने, मिळालेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. पण याचसोबत तिने सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल आपली भीती व्यक्त केली. ती म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जे काही सुरू आहे, ते खरं तर भांबावून टाकणारे आहे. खूप छान कमेंट्स, मेसेज आणि भरभरून प्रेम मिळत आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या ओळखीच्या लोकांनी मला अनेक मीम्स पाठवले आहेत. त्यातील काही खूप क्रिएटिव्ह आहेत, तर काही AI तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले अश्लील आणि मॉर्फ केलेले फोटो आहेत. कुठल्याही पद्धतीने लोकांनी पोस्टकडे आकर्षित व्हावे म्हणून हा खटाटोप सुरू असतो, याची मला कल्पना आहे."
advertisement
आई म्हणून १२ वर्षांच्या मुलाची चिंता
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि फोटो मॉर्फिंगमुळे गिरिजाला तिच्या १२ वर्षांच्या मुलाची चिंता सतावत आहे. मनातील भीती व्यक्त करत ती म्हणाली, "मला १२ वर्षांचा मुलगा आहे. सध्या तो सोशल मीडियाचा वापर करत नाही, पण पुढे जेव्हा तो याचा वापर करेल, तेव्हा त्याला हे मॉर्फ केलेले फोटो दिसतील, कारण ते इंटरनेटवर कायम राहतील. मोठा झाल्यावर त्याने हे फोटो पाहिल्यावर त्याला काय वाटेल, याचा विचार करून मला अजिबात छान वाटत नाही. त्याला माहीत असेल की हे फोटो मॉर्फ आहेत, तरीही ही गोष्ट त्रासदायक आहे."
गिरिजाचे कळकळीचे आवाहन
गिरिजाने आपल्या मनोगतातून चाहत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे. गिरिजा म्हणाली, "जर तुम्ही अशा प्रकारचे फोटो/व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांपैकी असाल, तर कृपया हा प्रकार थांबवा. आणि जर तुम्ही असले फोटो लाईक करणाऱ्यांपैकी असाल, तरीही एकदा विचार करा."
सध्याचे तंत्रज्ञान आणि त्याचा गैरवापर किती भीतीदायक आहे, हे गिरिजाने यातून स्पष्ट केले आहे. गिरिजाने तिच्या या मनोगतामधून तिच्या मनातली भीतीही व्यक्त केली आहे. सध्याचे तंत्रज्ञान आणि त्याचा गैरवापर हे सर्वच खूप भीतीदायक असल्याचे तिने सांगितले आहे. दरम्यान, गिरिजाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत तिच्या या स्पष्ट मताचे आणि प्रामाणिक भूमिकेचे चाहत्यांनी स्वागत केले आहे.
