आई-मुलींच्या नात्यातील न बोललेल्या भावना, आठवणी आणि स्त्रियांच्या भावविश्वाचा हळुवार वेध घेणारा हा सिनेमा येत्या 6 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मिती नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे.
advertisement
सुप्री मीडिया प्रस्तुत, कोक्लिको पिक्चर्स निर्मित व जीजिविषा काळे दिग्दर्शित 'तिघी' हा सिनेमा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 24 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (पीआयएफएफ) च्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात 'तिघी'ची अधिकृत निवड झाली आहे. या आधी या टीमचे 'पुणे ५२', 'गोदावरी', 'जून', 'रावसाहेब' हे चित्रपट या फेस्टिवलमध्ये झळकले आहेत. 'तिघी' च्या निमित्ताने पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसोबत त्यांचा हा प्रवास पुढे सुरु आहे.
‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना, बदलत्या काळात नात्यांमध्ये येणारे भावनिक चढ-उतार आणि आयुष्याकडे पाहाण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन प्रभावीपणे या सिनेमात मांडण्यात आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून, सिनेमात भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी या तीन दमदार अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
संवेदनशील विषय, सशक्त अभिनय आणि नात्यांवर भाष्य करणारी कथा यामुळे हा सिनेमा महोत्सवाच्या चौकटीतही ठळकपणे लक्ष वेधून घेत आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर आशयघन आणि संवेदनशील कथा अनुभवायला मिळाव्यात, हाच कोक्लिको पिक्चर्सचा मुख्य उद्देश आहे. समाजाशी जोडलेल्या, मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पडद्यावर साकारत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे यावर या निर्मितीसंस्थेचा भर असतो. प्रेक्षकांसाठी दर्जेदार आशय देण्याचे ध्येय कोक्लिको पिक्चर्स सातत्याने जपत आहे.
